पंतप्रधान मोदी यांच्या कथुआ येथील वक्तव्याला प्रत्त्युत्तर
मुस्लीम व अल्पसंख्याकांना देशातून घालवून देशाचे विभाजन करण्याचा भाजपचा कुटिल डाव आहे, अशी टीका पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी केली. पंतप्रधानांनी जम्मूतील कथुआ येथील सभेत केलेल्या वक्त व्यावर त्यांनी वरील वक्तव्य केले.
कथुआ येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, अब्दुल्ला व मुफ्ती या दोन कुटुंबानी जम्मू काश्मीरच्या तीन पिढय़ा बरबाद केल्या, पण आम्ही त्यांना देशाचे तुकडे करू देणार नाही असे म्हटले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने मोदी यांनी वरील टीका केली होती.
राज्याच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले,की पंतप्रधान राजकीय घराण्यांवर निवडणुकीत टीका करतात पण नंतर दूत पाठवून आमच्या पक्षांशी आघाडीचे प्रयत्न करतात. नॅशनल कॉन्फरन्सशी १९९९ मध्ये, तर पीडीपीशी २०१५ मध्ये भाजपने युती केली होती. जर त्यांना ३७० कलम रद्द करावेसे वाटते तर मग ते सत्तेला महत्त्व का देतात. सत्तेसाठी आमच्याकडे आघाडय़ा करण्याकरता दूत का पाठवतात. मुस्लीम व अल्पसंख्याक यांना देशातून घालवून देऊन भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत, असा आरोप त्यांनी ट्विटर संदेशात केला. मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना असे म्हटले होते,की काश्मिरी पंडितांचे खोऱ्यातून स्थलांतर काँग्रेसमुळे झाले. भाजप मात्र त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी नेऊन त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाही.