भाजपचा मंत्रिमंडळातील कोटा वाढला; पीडीपीने पूर्वीचे २ मंत्री वगळले
जम्मू-काश्मीरच्या तेराव्या मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांनी २२ मंत्र्यांसह सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत. सत्तारूढ आघाडीत पीडीपीचा भागीदार असलेल्या भाजपला नव्या मंत्रिमंडळात वाढीव जागा मिळाल्या आहेत.
काळ्या रंगाच्या पोशाखात आलेल्या मेहबूबा यांनी उर्दूमध्ये पद व गोपनीयतेची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री होणार असलेले भाजपचे निर्मल सिंग यांनी त्यांच्यापाठोपाठ हिंदीत शपथ घेतली. मेहबूबांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूमुळे राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनी राज्यात नवे सरकार पदारूढ झाले आहे.
राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी या दोघांशिवाय आणखी २१ मंत्र्यांना शपथ दिली. या वेळी भाजपचा मंत्रिमंडळातील वाटा वाढला असून त्यांना पूर्वीच्या ६ ऐवजी ८ कॅबिनेट मंत्री, तसेच ३ राज्यमंत्री मिळाले आहेत. पीडीपीचे पूर्वीच्या ११ ऐवजी ९ कॅबिनेट मंत्री व ३ राज्यमंत्री आहेत. अल्ताफ बुखारी व जावेद मुस्तफा या दोन मंत्र्यांना पीडीपीने या वेळी वगळले आहे.
यापूर्वीच्या सरकारमध्ये भाजपचे ६ कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्री व २ स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री होते. दिवंगत फुटीरतावादी नेते अब्दुल गनी लोन यांचे चिरंजीव सज्जाद गनी लोन हे भाजपच्या कोटय़ातून नव्या रचनेतही कायम आहेत.
सईद यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार पाहणाऱ्या चेरिंग दोरजे व अब्दुल गनी कोहली यांना भाजपने बढती देऊन कॅबिनेट मंत्री केले आहे; तर प्रकाश कुमार व श्यामलाल चौधरी या नव्या चेहऱ्यांना या वेळी संधी दिली आहे. पक्षाचे नेते सुखनंदन यांना पक्षाने वगळले असून, उधमपूरचे अपक्ष आमदार पवन गुप्ता यांच्या जागी अजय नंदा यांना मंत्रिपद दिले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू व जितेंद्र सिंग यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभाला उपस्थित होत्या; तथापि पीडीपीचे खासदार तारिक हमीद कार्रा आणि काँग्रेसने कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.
मेहबूबा या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यामुळे राज्याच्या व देशाच्याही इतिहासात एका महत्त्वाच्या घटनेची नोंद झाली आहे.
जम्मू-काश्मीरचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असून, भारतातील कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री होणाऱ्या दुसऱ्या मुस्लीम महिला आहेत. यापूर्वी १९८०-८१ या कालावधीत आसामचे मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या सैयदा अन्वरा तैमूर या देशातील पहिल्या मुस्लीम महिला होत्या.

पंतप्रधानांच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारला शुभेच्छा देतानाच, हे सरकार राज्यातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही नवे आघाडी सरकार राज्याला आणखी नव्या उंचीवर नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही मेहबूबा यांचे अभिनंदन केले.

Story img Loader