पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचं नाव सध्या चर्चेत आहे. अँटिग्वामध्ये वास्तव्यास असलेला मेहुल चोक्सी अचानक तिथूनही फरार झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तो डोमिनिकामध्ये सापडला होता. डोमिनिकामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून चोक्सी वेगवेगळे दावे करत आहे. यात त्याने आपलं अपहरण करण्यात आलं होतं आणि गर्लफ्रेंड बारबरा जराबिका या कटात सहभागी होती, असाही आरोप केला होता. चोक्सीच्या आरोपांपासून जराबिकाबद्दल वेगवेगळी चर्चा रंगत आहेत. अखेर या सर्व चर्चा आणि आरोपांवर जराबिकाने मौन सोडत उत्तर दिलं आहे.
मेहुल चोक्सीमुळे चर्चेत आलेल्या बारबरा जराबिकाने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कर्जबुडव्या मेहुल चोक्सीच्या अपहरणात आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचंही जराबिकाने स्पष्ट केलं आहे. मेहुल चोक्सी आपल्याला मागच्या वर्षी अँटिग्वाच्या भेटीदरम्यान भेटला होता आणि त्याने स्वतःची ओळख राज म्हणून करून दिली होती, असंही जराबिकाने म्हटलं आहे.
हेही वाचा- मेहुल चोक्सीच्या गर्लफ्रेण्डचे फोटो आले समोर; डिनर डेटला गेलेला असतानाच झाली अटक
“मी चोक्सीची मैत्रीण होते. माझ्याशी भेटल्यानंतर चोक्सीने स्वतःची राज म्हणून ओळख करून दिली होती. गेल्या वर्षी मी अँटिग्वात असताना चोक्सीने मला भेटला होता. आमच्या मैत्री झाली आणि नंतर त्याने फ्लर्ट करायला सुरुवात केली. त्याने मला डायमंड रिंग आणि ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिलं होतं. जे की बनावट असल्याचं नंतर आढळून आलं,” असं जराबिका म्हणाली.
मी आणि माझं कुटुंब तणावात
डोमिनिकामध्ये पोलिसांनी अटक केल्यानंतर चोक्सीने अपहरण झाल्याचा दावा केला होता. त्याच्या वकिलानीही याला दुजोरा दिला होता. यात प्रकरणात चोक्सीची गर्लफ्रेंड बारबरा जराबिकाचं नाव घेतलं होतं. तिचा यात हात असल्याचा आरोपही करण्यात आला. हे सर्व आरोप जराबिकाने फेटाळून लावले आहेत. “चोक्सीच्या अपहरणात आपला कसलाही सहभाग नाही. मेहुल चोक्सीच्या वकिलांकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून यात माझं नाव जबरदस्ती घेतलं जात आहे. यामुळे मी आणि माझं कुटुंब सध्या तणावाखाली जगत आहे,” असंही जराबिकाने म्हटलं आहे.
व्हायरल होत असलेले फोटो कुणाचे?
सध्या मेहुल चोक्सी याची कथित गर्लफ्रेंड म्हणून जे फोटो व्हायरल होत आहेत, ते बारबरा जराबिका नावाच्या तरुणीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरचे आहेत. अशाच प्रकारचे फोटो तिच्या ट्विटर आणि लिंक्डइन प्रोफाईलवर देखील सापडले आहेत. तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर तिची माहिती बल्गेरियातील प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट एजंट अशी देण्यात आली आहे. तिला १० वर्षांचा सेल्सचा अनुभव देखील असल्याचं या प्रोफाईलवर नमूद करण्यात आलं आहे. पण काही दिवसांपूर्वीपर्यंत या प्रोफाईलवर तिनं लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिक्षण घेतल्याचा उल्लेख होता. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर हा उल्लेख तिथून काढण्यात आला आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सनं देखील अशा नावाची कोणतीही व्यक्ती इथे शिकायला नसल्याचं म्हटलं आहे.