देशातील पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला कर्करोग अर्थात कॅन्सर झाल्याची शक्यता आहे. त्याच्या वकिलांनीच तशी माहिती मुंबई येथील विशेष न्यायालयात दिली आहे. मेहुल चोक्सीवर उपचार सुरु आहेत त्याच्या काही चाचण्याही करण्यात येत आहेत असं वकील विजय अग्रवाल यांनी विशेष न्यायालयाला सांगितलं.

मेहुल चोक्सीच्या वकिलांनी काय सांगितलं?

मेहुल चोक्सीचे वकील अॅडव्होकेट विजय अग्रवाल यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मनोज जोज यांना सांगितलं की मेहुल चोक्सीला कर्करोग झाल्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात त्याच्या काही चाचण्या सुरु आहेत. नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी या दोघांनी मिळून पीएनबी बँकेत घोटाळा केला. हा घोटाळा १२ हजार कोटींहून अधिक आहे.

तपास यंत्रणांची जोरदार कारवाई सुरु

तपास यंत्रणांची मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. तपास यंत्रणांनी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या भारतातील मालमत्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी पकडले जावेत यासाठी त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येत आहे. पण तपास यंत्रणांच्या याच कारवाई विरोधात मेहुल चोक्सीने कोर्टात धाव घेतली आहे. आपण आजारी असल्याचं कारण देत कोर्टात हजर राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला वेळ द्यावा. तसेच संबंधित कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी चोक्सीकडून करण्यात आल्याची माहिती आहे. तर त्याच्या वकिलाने मेहुल चोक्सीला कॅन्सर झाल्याची शक्यता वर्तवली आहे.

मेहुल चोक्सीचा पासपोर्टही रद्द

मेहुल चोक्सीवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीच्या जप्त केलेल्या साऱ्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेनं सुरू केली आहे. जेणेकरून त्याची आर्थिक कोंडी करणं शक्य होईल. मात्र, मेहुल चोक्सीनं प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास शक्य नाही असं त्याच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे, मेहुल चोक्सीची भारतात येण्याची प्रक्रिया आणखी काही काळासाठी पुढे गेली आहे. दरम्यान, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणाच्या तपास फाईल्स मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

२०१८ मध्ये PNB घोटाळा उघड झाला

पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा २०१८ मध्ये उघडकीस आला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे.

Story img Loader