अमेरिका-मेक्सिको सीमेवर लहान मुलांची त्यांच्या पालकांपासून ताटातूट घडवून आणणाऱ्या इमिग्रेशन धोरणात अखेर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बदल केला आहे. मेक्सिकोतून अनेक जण आपल्या संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेत बेकायद प्रवेश करतात. पण आता ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत बेकायद वास्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

मेक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश करताना पकडल्यास आई-वडिलांना तुरुंगात टाकून लहान मुलांना दुसऱ्या ठिकाणी ठेवले जात होते. ट्रम्प प्रशासनाच्या या कृतीवर चौफेर टीका सुरु झाल्यामुळे अखेर ट्रम्प यांनी शासकीय आदेशावर स्वाक्षरी करुन हा निर्णय मागे घेतला आहे.

सोमवारपर्यंत ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी डेमोक्रॅटसना जबाबदार धरले होते. अमेरिकेने स्थलांतरीतांसाठी शिबीर भरवलेले नाही असे ते म्हणाले होते. पण अखेर घरातील सदस्य, मित्र परिवार आणि सभागृह सदस्यांच्या विनंतीमुळे ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली आहे. ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावरुन जी माघार घेतली त्यामध्ये त्यांची पत्नी मेलेनिया आणि इवांका ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली अशी माहिती अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

Story img Loader