महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी धक्कादायक युक्तीवाद कोर्टात केला. “कोणत्याही लैंगिक हेतुशिवाय एखाद्या महिलेला केवळ स्पर्श करणे म्हणजे गुन्हेगारी कृती ठरत नाही”, असं ब्रिजभूषण शरण सिंह यानी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. ब्रिजभूषण सिंह आणि डब्ल्यूएफआयचे निलंबित सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चित करण्याबाबत न्यायालयाने युक्तिवाद ऐकला. त्यानंतर, ब्रिजभूषण यांच्या वकिलांकडून हे उत्तर देण्यात आले.
“लैंगिक हेतूशिवाय स्त्रीला फक्त स्पर्श करणे यात गुन्हेगारी कृतीचा समावेश नाही. ही कुस्तीची स्पर्धा आहे. प्रशिक्षक बहुतेक पुरुष असतात. देशासाठी काही केल्याच्या आनंदात, प्रशिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला मिठी मारली, तर तो गुन्हा मानला जाऊ नये”, असं सिंह यांची बाजू मांडणारे अॅड. राजीव मोहन यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांना सांगितले.
सिरी फोर्टमधील कुस्ती स्पर्धेदरम्यान सिंग यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मोहन म्हणाले की, या प्रकरणात कोणतीही लैंगिक कृती नव्हती. यात फक्त मिठी मारली गेली होती. कुस्तीपटूंनी नमूद केलेली काही प्रकरणे दिल्ली न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्राबाहेर आहेत. भारताबाहेर घडलेली प्रकरणे केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय न्यायालयात चालवता येणार नाहीत, असेही मोहन म्हणाले.
पीडितांनी केलेल्या तक्रारीनुसार काही गुन्हे दिल्ली, बेल्लारी आणि लखनौ येथील आहेत. ब्रिजभूषण सिंह यांचे वकिल मोहन म्हणाले की, लैंगिक छळ हा क्षणिक गुन्हा आहे आणि तो सतत होत नाही. क्रीडा मंत्रालयाच्या पर्यवेक्षण समितीने चौकशी केली तेव्हा त्यांना सिंह यांच्याविरोधातील तक्रारीत तथ्य आढळले नाही.”
आजही याप्रकरणी सुनावणी होणार आहे. कोर्टाने २० जुलै रोजी सिंह आणि तोमर यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काही अटींसह जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये आणि साक्षीदारांना कोणतेही प्रलोभन देऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.