प्रादेशिक राजकारणापुरते अस्तित्व उरलेल्या व कधीकाळी एकत्र नांदणाऱ्या सहा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जनता परिवारात विलीन होण्याची घोषणा केली. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष, जनता दल (संयुक्त), भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी) व समाजवादी जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना जनता परिवाराचे कुटुंबप्रमुख घोषित करण्यात आले. या सहा पक्षांनी एकत्र येऊन जनता परिवार एकसंध राहणार असल्याच्या आणाभाका घेत नव्या पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह, झेंडा, धोरणात्मक भूमिका निश्चित करण्याची जबाबदारी मुलायमसिंह यादव यांच्यावर टाकली. प्रस्तावित राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुलायमसिंह यांच्या नावाची घोषणा जदयूचे सर्वोच्च नेते शरद यादव यांनी केली. या वेळी राजदचे लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, जदयू धर्मनिरपेक्षचे एचडी देवेगौडा, आयएनएलडीचे अभय चौटाला उपस्थित होते.
मुलायमसिंह यादव म्हणाले की, केंद्रात बहुमत मिळाल्याने भाजपचा अहंकार वाढला आहे. भाजप नेत्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये दंगल घडवून आणल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकाराची माहिती दिल्यावर केंद्रातील नेत्यांनी दुर्लक्ष केले. मतदारांची दिशाभूल करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली, अशी घणाघाती टीका लालूप्रसाद यादव यांनी केली. ते म्हणाले की, भाजपविरोधातून जनता परिवार एकसंध झाला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही धर्मनिरपेक्षता, समाजवाद या तत्त्वांचे महत्त्व लोकांना सांगू. भाजप सरकारचा शेतकरीविरोध, विकासाची खोटी स्वप्ने याचा प्रचार करू. समतामूलक समाजाची निर्मिती करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा