रेल्वेत पान खाऊन थुंकणे, घाण करणे, भित्तिपत्रके चिकटवणे तसेच रेल्वेच्या परिसरात लघुशंका करणे, आंघोळ करणे अशा अनेक घटना आपण नेहमीच पाहतो. मात्र रेल्वे मंत्रालयाने याची आता गंभीर दखल घेतली आहे. यापुढे रेल्वेच्या डब्यात अथवा रेल्वे परिसरात घाण करणाऱ्यांविरोधात कडक दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे स्वच्छताही वाढेल आणि दंडाद्वारे महसूलही वाढेल, अशी शक्यता आहे.
स्वच्छतेबाबत भारतीय रेल्वेच्या नियम २०१२ नुसार, रेल्वेच्या हद्दीत कचरा टाकणे, घाण करणे, थुंकणे, आंघोळ करणे, लघुशंका करणे, नैसर्गिक विधी करणे, प्राण्यांना खाऊ घालणे अशा प्रकरणांमध्ये ५०० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे रेल्वेत पत्रके लावणे, लिहिणे, चित्रे काढणे आदी गोष्टींनाही या नियमाअंतर्गत दंडासाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांवरील अधिकृत विक्रेते आणि फेरीवाल्यांना यापुढे कचरा टाकण्यासाठी तसेच त्याची विल्हेवाट लावण्याबद्दल योग्य ती व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, रेल्वेत तसेच रेल्वे परिसरात घाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे तसेच दंड आकारण्याचे अधिकार स्टेशन मास्तर, तिकीट तपासनीस तसेच त्यावरील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छता ही रेल्वे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. याआधी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात अस्वच्छतेला आळा घाळण्यास मदत मिळाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.