उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाच्या चर्चा जोरात होत्या. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे यासंदर्भात प्रत्यक्षपणे कोणीच प्रतिक्रिया देत नव्हतं. दिल्लीवरुन लखनऊला आलेल्या भाजपा नेत्यांनी नुकतीच राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालीच आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्रीच पक्षाचा प्रमुख चेहरा असतील त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी मंगळवारी रात्री मागील पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील करोना परिस्थितीचं उत्तम व्यवस्थापन केल्याचं सांगत कौतुक केलं आहे. संतोष यांच्या या ट्विटमुळे राज्यातील राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्यतांना पूर्णविराम लागल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राधा मोहन सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील नेतृत्वबदलाच्या बातम्यांना काल्पनिक आणि कोणत्या तरी डोक्यामधून आलेली कल्पना असं म्हटलं आहे. संतोष यांच्यासोबत लखनऊच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची भेट घेतली.

मोदी आणि शाह यांचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा योगी आदित्यनाथ यांना असल्याचे स्पष्ट संकेत भाजपाच्या नेत्यांनी दिलेत. केंद्र सरकारने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून सध्याच्या घडीला तरी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथच भाजपासाठी सर्वात मोठे नेते आहेत. आपल्या प्रशासनाचा कारभार, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, स्वच्छ प्रतिमा यासारख्या गोष्टींमुळे योगी राज्यामध्ये लोकप्रिय असल्याचा विश्वास दिल्लीला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता योगीच उत्तम असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्रीमंडळात होणार मोठे बदल

एकीकडे योगींना पाठींबा असला तरी दुसरीकडे पक्ष बांधणी आणि उत्तर प्रदेशमधील मंत्रीमंडळामध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याने न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार, मंत्रीमंडळामध्ये मोठे बदल होणार आहेत. जातीय समीकरणे आणखीन मजबूत करण्यासाठी काही नवीन लोकांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल. तर काही मंत्र्यांना पक्ष बांधणीच्या विचाराने काम करण्यास सांगण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षासमोर काय आव्हाने आहेत यासंदर्भातील माहिती संतोष आणि सिंह यांनी भाजपा कार्यकर्ते, नेते यांच्यासोबतच्या पैठकीमध्ये घेतल्याचं समजतं. योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास राज्यातील सर्वच नेते तयार असल्याचं चित्र दिसत आहे.

…म्हणून योगीच उत्तम

केंद्रातील एका वरिष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा गट लखनऊला पाठवण्यामागे राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्याचा हेतू होताच मात्र त्यासोबतच राज्यामध्ये झालेल्या पंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांच्या आधीच्या तयारीसंदर्भातही हा दौरा महत्वाचा आहे. देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. आदित्यनाथ यांनी करोना परिस्थिती चांगली हातळ्याचं दिल्लीचं मत आहे. आदित्यनाथ हे राज्यातील भाजपाचा सर्वात महत्वाचा चेहरा आहे. केशव प्रदसाद मौर्य यांना वगळल्यास भाजपाचा कोणताच नेता उत्तर प्रदेशमधील सक्रीय राजकारणामध्ये नाहीय. उत्तर प्रदेशमध्ये मागील निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या समाजाची मतं मिळवण्यासाठी राजनाथ सिंह, कलराज मिश्रा, मनोज सिन्हा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासहीत अनेक नेत्यांनी प्रचारसभा घेतलेल्या. मात्र योगींच्या प्रचारसभांची त्यावेळीही खूप मागणी होती. त्यांची लोकप्रियता पाहूनच त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं. राजनाथ सिंह यांना राज्याच्या राजकारणात येण्यामध्ये रस नसल्याचा फायदा योगींना झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात. मनोज सिन्हा यांना नुकतेच उपराज्यपाल म्हणून जम्मू काश्मीरला पाठवण्यात आलं. तर कलराज मिश्रांना राज्यपाल म्हणून राजस्थानला पाठवण्यात आलं आहे. मौर्य हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

Story img Loader