Meta Antitrust Trial FTC Case Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांना सध्या फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) दाखल केलेल्या फसवणुकीच्या खटल्याचा सामना करावा लागत आहे. या खटल्यात झुकरबर्ग यांनी नुकतीच त्यांची बाजू मांडली. त्यांनी इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपचं अधिग्रहण आणि या क्षेत्रातील मक्तेदारीच्या आरोपांविरोधात मेटाचा (झुकरबर्ग यांच्या मालकीची कंपनी. फेसबूक, इन्स्टा, व्हॉट्सअॅप व थ्रेड हे अॅप्स मेटाच्या मालकीचे आहेत) बचाव केला.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार झुकरबर्ग एफटीसीसमोर म्हणाले, “मेटा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सशी स्पर्धा करत आहे. लोकांना त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाईकांशी जोडणं हे मेटाचं मुख्य उद्दीष्ट आहे. तसेच मेटा त्यांना जगाबद्दल जाणून घेण्याची, माहितीचं आदान-प्रदान करण्याची संधी देतो.”
एफटीसीने २०११ ते २०१२ मधील झुकरबर्ग यांच्या ईमेल्सचा दाखला दिला आहे. ज्यामध्ये झुकरबर्ग यांनी इन्स्टाग्राम हे त्यांचा (फेसबूकचा) प्रमुख प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्म असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी काहीच महिन्यांत त्यांनी इन्स्टाग्राम खरेदी केलं.
…तर झुकरबर्ग यांना Instagram-WhatsApp विकावं लागू शकतं
फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप व थ्रेडची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाविरोधात अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये अविश्वास प्रकरणाची सुनावणी चालू आहे. यूएस कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर वॉचडॉगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समधील स्पर्धा संपवण्यासाठी, या क्षेत्रात एकाधिकार (मोनोपोली) निर्माण करण्यासाठी झुकरबर्ग यांनी २०१२ मध्ये इन्स्टाग्राम व २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप खरेदी केल्याचा आरोप केला आहे. ब्लुमबर्गने आपल्या अहवालात म्हटलं आहे की हे आरोप सिद्ध झाले तर झुकरबर्ग यांना इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅप विकावं लागू शकतं.
लोकांना जोडणं ही आमची प्राथमिकता : झुकरबर्ग
मीडिया रिपोर्टनुसार, न्यायालयासमोर मार्क झुकरबर्ग म्हणाले, “लोकांना त्यांच्या मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर जोडणं ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही सुरुवातीपासूनच लोकांना जगभरात काय चाललंय ते जाणून घेण्याची, समजून घेण्याची संधी देत आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जोडत आहोत.
इन्स्टाग्रम का खरेदी केलं? झुकरबर्ग म्हणाले…
या खटल्यातील एफटीसीचे मुख्य वकील डॅनियल मॅथेसन यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना झुकरबर्ग म्हणाले, “लोकांना त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करता याव्यात, इतरांबद्दलच्या गोष्टी जाणून घेता याव्यात यासाठी आम्ही फेसबूकवर २००६ मध्ये न्यूज फीड हे फीचर सुरू केलं. तसेच मी इन्स्टाग्राम हे अॅप त्यांच्या सोशल नेटवर्कमुळे नव्हे तर उत्तम कॅमेरा तंत्र व फोटोशी संबंधित फीचर्समुळे विकत घेतलं.