Mark Zuckerberg Apology : फेसबुकचे संस्थापक मार्ग झुकरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी २०२४ मध्ये जगभरात झालेल्या निवडणुकांवर भाष्य केले होते. यामध्ये त्यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीचा उल्लेखही केला होता. यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या दिशाभूल करणाऱ्या विधानासाठी संसद आणि भारतीय लोकांची माफी मागावी अशी मागणी केली होती. यावेळी दुबे यांनी, माफी न मागितल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. दरम्यान कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्याबद्दल मेटा कंपनीने बुधवारी भारताची माफी मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जो रोगन पॉडकास्टच्या एका भागात मार्क झुकरबर्ग यांनी दावा केला होता की, “कोविड-१९ महामारीमुळे जगातील अनेक सरकारांवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे निवडणुकींमध्ये या सत्ताधाऱ्यांना सत्ता गमावावी लागली. यामध्ये भारताचाही समावेश आहे.” झुकेरबर्ग यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता मेटा इंडियाने याबाबत माफी मागत प्रकरणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

अनावधानाने चुकीचे विधान

भारताची माफी मागताना मेटा कंपनीने म्हटले आहे की, मार्क झुकरबर्ग यांचे विधान अनेक देशांसाठी खरे असले तरी भारतासाठी लागू नव्हते.

या प्रकरणावर भाष्य करताना मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठाकुराल यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये सीईओंच्या ‘अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल’ माफी मागितली. ते म्हणाले “२०२४ च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत हे मार्क यांचे निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे, पण ते भारतासाठी लागू नाही. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागू इच्छितो. भारत मेटासाठी एक महत्त्वाचा देश आहे.”

झुकरबर्ग चुकीची माहिती पसरवत आहेत

दरम्यान या प्रकरणी केंद्रीय मंत्री अश्विनी वौष्णव यांनी या प्रकरणाचे खंडन करत एक्सवर पोस्ट करत त्यांना फटकारले होते. अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, “झुकरबर्ग त्यांची कंपनी फेसबुकद्वारे चुकीची माहिती पसरवत आहेत. ही अशी चुकीची माहिती पाहून निराशा होते. आपण तथ्ये आणि विश्वासार्हता जपली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की, “८० कोटी लोकांना मोफत अन्न, २२० कोटी लोकांना मोफत लसीकरण आणि कोविड दरम्यान जगभरातील देशांना मदत करण्यापासून ते भारताला सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून नेण्यापर्यंत, पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील निर्णायक विजय हा सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे.”

दरम्यान वैष्णव यांच्या याच पोस्टला शिवनाथ ठाकुराल यांनी उत्तर देत माफी मागितली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta apologizes for mark zuckerbergs 2024 india poll loss remark aam