अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर संबंधितांकडून लैंगिक छळाची तक्रार करून आपल्यावर दहा वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर बॉलीवूड आणि प्रसारमाध्यमांतील अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा समाजमाध्यमांवर मांडत आहेत. मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना सध्या ‘मी टू मोहिमे’च्या निमित्ताने वाचा फुटत असून या मोहिमेने वादळी रूप धारण केले आहे.
#MeToo आणि #TimesUp या हॅशटॅगचा वापर करुन महिला आपल्यावरील अन्यायाबाबत बोलत आहेत. भारतामधील महिलांनी इंटरनेटवर हे हॅशटॅग वापरून आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबद्दल खुलेपणे बोलायला सुरुवात केली आणि त्याचे वेगाने पडसाद उमटले. काय होते आहे हे कळायच्या आत अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांमागे दडलेल्या लैंगिक शोषणाच्या कथा बाहेर पडू लागल्या. ‘मी टू’ ही स्त्रीवादी विचारधारेतीलच एक लाट आहे, असे तिला संबोधले जात असले तरी यापलीकडे जाऊन व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलणं, व्यक्त होणं गरजेचं आहे. तरुणाईसुद्धा या विषयाकडे प्रगल्भपणे पाहू लागलीय, ही महत्त्वाची बाब आहे. याचंच औचित्य साधत शारिरीक संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कंडोम कंपन्यांनीही जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ड्युरेक्स या कंडोम कंपनीने ट्विटरवर टाकलेल्या एका क्रिएटीव्ह पोस्टद्वारे शारिरीक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची परवानगी किती महत्त्वाची असते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मॅनफोर्स या कंपनीनेही शारिरीक संबंध बनवण्याआधी पुरूषांनी दहा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात या आशयाची पोस्ट केली आहे. या 10 च्या 10 गोष्टींमध्ये शारिरीक संबंधांसाठी समोरच्या व्यक्तीचा नकार असेल तर त्या नकाराचा सन्मान करावा, नकार हा नकारच असतो असा संदेश दिला आहे.
Dear Men, mend your ways! pic.twitter.com/Wsx9boXj3a
— Manforce Condoms (@ManforceIndia) October 15, 2018
—
Ask for it. #TimesUp pic.twitter.com/krFuh7rvOY
— Durex India (@DurexIndia) October 11, 2018
—