परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. ‘करंजवाला अँड कंपनी’ ही लॉ फर्म कोर्टात अकबर यांचा खटला लढणार आहे. पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात त्यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांनी कोर्टात धाव घेतल्याच्या काही क्षणातच पत्रकार प्रिया रमाणी यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. ट्विट करत आपण कोर्टाची लढाई लढण्यास तयार असल्याचे मत प्रिया रमाणी यांनी मांडले आहे.

“केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास मी तयार आहे. सत्य हाच माझा बचाव आहे. अकबर यांनी तक्रारकर्त्यां महिलांचे दु:ख आणि भय याकडे अजिबात लक्ष दिले नाही. अनेक महिलांनी केलेले तपशीलवार आरोप एका केंद्रीय मंत्र्यांनी ‘राजकीय कट’ म्हणून फेटाळून लावल्याचे पाहून मी निराश झाली आहे.” असं त्या म्हणाल्या आहेत. अकबर यांच्याविरोधात एक, दोन नव्हे तर 10 महिलांनी आरोप केले आहेत. अकबर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांकडून सुरू आहे.

 भाजप नेते आणि प्रवक्त्यांनी आतापर्यंत याप्रकरणी मौन पाळले होते. मात्र अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातही जोर धरू लागल्याने भाजपच्या प्रवक्त्यांना प्रतिक्रिया द्यावी लागली. अकबर यांच्याविरुद्ध काही महिलांनी केलेल्या लैंगिक छळणुकीच्या आरोपांबाबत अकबर यांनी जे स्पष्टीकरण दिले त्याच्याशी भाजपा सहमत आहे की नाही, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता, ‘सहमतीचा किंवा असहमतीचा प्रश्नच नाही, त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे,’ असे राव म्हणाले.

(आणखी वाचा : ९७ वकिलांची फौज एम.जे.अकबर यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सज्ज)

आरोप करणाऱ्या महिलांविरोधात कायदेशीर लढाई देण्याचं अकबर यांनी ठरवलंय. आपल्यावर झालेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. रविवारी आफ्रिकेहून परतलेल्या अकबर यांनी आपल्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मी टू वादळ का सुरू झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ‘माझ्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप बनावट आहेत. अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावले उचलतील’, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार आज त्यांच्या वकिलांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला.

(आणखी वाचा : #MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात…)

Story img Loader