मेट्रो प्रकल्पांना भांडवल जास्त लागते व भारतातील सर्वच शहरांसाठी मेट्रो हा वाहतुकीचा पर्याय सुयोग्य नाही, काही शहरांसाठीच तो योग्य आहे, असे केंद्रीय नागरी विकासमंत्री कमलनाथ यांनी सांगितले. मध्यम आकाराच्या शहरांसाठी ट्रामवे प्रकल्प राबवता येतील अशी सूचनाही त्यांनी केली.
ते म्हणाले, की रेल्वेपेक्षा ट्रामवेसाठी मार्ग तयार करणे सोपे, कमी खर्चिक व आजूबाजूच्या भागाची कमी हानी करणारे असते. ट्राम चालवण्याचा खर्च कमी असतो, वळणाच्या ठिकाणीही त्यात काही तडजोडी करता येतात, त्यामुळे जमीनही कमी लागते. भारतातील मध्यम आकाराच्या शहरांसाठी एखादा ट्रामवे प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात राबवून पाहायला हरकत नाही. मोठय़ा शहरातही पूरक म्हणून त्यांचा वापर करता येऊ शकेल.
नेक्स्ट जनरेशन ट्रामवे सोल्युशन या इंडो-फ्रेंच चर्चासत्रात कमलनाथ बोलत होते. त्यांनी सांगितले, की मेट्रो प्रकल्पांना सरकारने अग्रक्रम दिला असून अनेक शहरांत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मेट्रोच्या मदतीने एकावेळी जास्तीत जास्त लोक ये-जा करू शकतात असे असले तरी मेट्रो प्रकल्पांना भांडवल अधिक लागते, बस रॅपिड ट्रान्सिट, लाइट रेल ट्रान्सपोर्ट व मोनो रेल या तीन पर्यायांचा वापर कमी क्षमतेच्या प्रवासी वाहतुकीसाठी करता येऊ शकतो, प्रत्येक स्थितीत त्यांचे काही फायदेतोटे आहेत. फ्रान्सच्या आर्थिक संबंध मंडळाचे प्रतिनिधी पॉल हेरमेलिन यांनीही कमलनाथ यांच्या मतास पाठिंबा दर्शवत ट्राम सेवा शहरी वाहतुकीसाठी चांगला पूरक मार्ग आहे असे सांगितले.
दिल्ली मेट्रोच्या यशानंतर सगळेच जण मेट्रोची मागणी करीत आहेत, परंतु पर्यायी वाहतूक साधनांचाही विचार केला गेला पाहिजे असे मत नागरी विकास सचिव सुधीर कृष्णा यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader