प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक एम. जी. के. मेनन यांचे निधन झाले आहे. देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मेनन यांनी पाच दशकांहून अधिक काळ योगदान दिले. वयाच्या ८८ व्या वर्षी मेनन यांनी जगाचा निरोप घेतला. अल्पशा आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
एम. जी. के. मेनन यांनी व्ही. पी. सिंह सरकारच्या मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले. याआधी मेनन केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. १९७२ मध्ये मेनन यांची इस्त्रोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली होती. एम. जी. के. मेनन यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संचालकपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल मेनन यांचा पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. मेनन यांनी वैश्विक किरण, पार्टिकल फिजिक्समध्ये मोठे संशोधन केले आहे.
१९८२ ते १९८९ या कालावधीत एम. जी. के. मेनन नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर १९८६ ते १९८९ या कालावधीत मेनन पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. १९८९ ते १९९० दरम्यान मेनन यांनी उपराष्ट्रपतींसह वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले. १९९० ते १९९६ या कालावधीत मेनन राज्यसभेचे खासदार होते.