Tahawwur Rana Extradiction : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला येत्या काही तासांत भारतात आणण्यात येणार आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथक अमेरिकेत त्याला आणण्यासाठी गेलं होतं. भारतात परतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, त्याच्या खटल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नरेंदर मान यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. बुधवारी रात्री एक राजपत्रित अधिसूचना जारी करून तीन वर्षांसाठी या खटल्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने राणाची कस्टडी मिळवली आहे आणि तो गुरुवारी (आज, १० एप्रिल रोजी) दिल्लीला पोहोचणार आहे.
एका अधिसूचनेत, संयुक्त सचिव अभिजित सिन्हा यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रीय तपास यंत्रणा कायदा, २००८ च्या कलम १५ च्या उप-कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) च्या कलम १८ च्या उप-कलम (८) सह केंद्र सरकारद्वारे दिल्ली येथील एनआयए विशेष न्यायालये आणि अपीलीय न्यायालयांसमोर एनआयएच्या वतीने आरसी-०४/२००९/एनआयए/डीएलआय प्रकरणाशी संबंधित खटले आणि इतर बाबी चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून वकील नरेंदर मान यांची नियुक्ती करत आहे. ही अधिसूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे.”
“अमेरिकेचा नागरिक असलेला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर हुसेन राणा यांनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हरकत-उल जिहादी इस्लामी (एचयूजी) च्या सदस्यांसोबत गुन्हेगारी कट रचला होता. या दोन्ही पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहेत”, असे त्यात म्हटले आहे.
हे मोदींचं यश – अमित शाह
“राणाचे प्रत्यार्पण हे पंतप्रधान मोदींच्या राजनैतिकतेचे मोठे यश आहे. भारताच्या सन्मानावर, भूमीवर आणि लोकांवर हल्ला करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्याला खटला आणि शिक्षेला सामोरे जाण्यासाठी येथे आणले जाईल. हे मोदी सरकारचे मोठे यश आहे”, असे शाह यांनी न्यूज १८ रायझिंग भारत समिटमध्ये बोलताना सांगितले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक, तीन गुप्तचर अधिकाऱ्यांसह, राणाला ताब्यात घेण्यासाठी रविवारी अमेरिकेत पोहोचले. “त्याला ताब्यात घेतल्यानंतर, पथक गुरुवारी सकाळी दिल्लीसाठी रवाना झाले”, असे एका सूत्राने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा दिल्लीत पोहोचल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि व्हिडिओ लिंकद्वारे त्याला न्यायालयात हजर केले जाईल.