केंद्र सरकारला ऑगस्ट २०१९ मधील बेकायदेशीर कृतीविरोधी कायद्यानुसार एखाद्या व्यक्तिला दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. या मूळ कायदा १९६७ नुसार आधी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषणा करता येत होती. यानंतर कायद्यातील दुरुस्तीनंतर सप्टेंबर २०१९ रोजी केंद्र सरकारने लष्करचा हाफिज सईद, जकी-उर-रहमान लखवी, जैशचा मसूद अजहर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दहशतवादी म्हणून घोषित केलं. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने मुश्ताक जरगरला दहशतवादी म्हणून जाहीर केलंय. ही घोषणा करताना गृहमंत्रालयाने जरगर केवळ भारताच्याच नाही, तर जगाच्या शांततेला धोका असल्याचं म्हटलंय. त्यानिमित्ताने हा मुश्ताक जरगर कोण आहे आणि त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काश्मीरमधील मुश्ताक अहमद जरगर या ५३ वर्षीय दहशतवाद्याचा इतिहास मोठा आहे. १९९९ मध्ये कंदहार येथे इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करून प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. या तीन दहशतवाद्यांपैकी एक म्हणजे मुश्ताक जरगर होय. या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्रालयाने जरगर जगाच्या शांततेला धोका असल्याचं म्हटलंय. जरगर अल-कायदा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या कट्टरतावादी संघटनांच्या संपर्कात राहिला आहे. जरगर उर्फ लाटूम अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलंय.

मुश्ताक जरगरवर नेमके काय आरोप?

मुश्ताक जरगर युएपीए अंतर्गत बंदी असलेली संघटना अल-उमर-मुजाहिद्दीन संघटनेचा संस्थापक आणि मुख्य कमांडर असल्याचा आरोप आहे. त्याआधी तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये सक्रीय होता. याशिवाय जरगर दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये देखील जाऊन आलाय. तो सध्या पाकिस्तानच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालत आहे, असाही आरोप आहे.

हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दहशतवादी हल्ल्यांची योजना तयार करणे, ती योजना राबवणे, दहशतवादासाठी निधी उभा करणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये मुश्ताक जरगरचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये निमलष्करी दलाच्या छावणीवर हल्ला, ६ जवानांचा मृत्यू तर २२ जखमी

दरम्यान मागील आठवड्यातच हाफिज सईदचा मुलगा तल्हा, मसुद अजरचा भाऊ आणि २०१९ मधील पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी अम्मार अल्वी आणि पठाणकोट हल्ल्यातील हँडलर अली लशिफ जान यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mha declares mushtaq ahmed zargar as terrorist who was released after kandahar hijacking pbs