जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये २ वैमानिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. नाशिकचा निनाद औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचा माजी विद्यार्थी होता. तिथून त्याची निवड पुणे येथे एनडीएमध्ये झाली. त्यानंतर तो हेलिकॉप्टर पायलट झाला.

बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या अपघातात निनादचा मृत्यू झाला. डीजीपीनगर नाशिकचे निनाद यांचा जन्म १९८६ ला झाला होता. निनादचे शिक्षण (पाचवी ते दहावीपर्यंत) भोसला मिलिटरी मध्ये तर ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झाले होते. नंतर त्याने बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर २००९ ला एअर फोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. ज्यानंतर ही दुःखद घटना घडली आहे.

निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईही सेवेतून सेवानिवृत्त झाली आहे. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे. आमच्या कुटुंबाचा आधारच गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली आहे.

सैन्यात सेवेत असणाऱ्याच्या मनाची मानसिकता ही अधांतरीतच असते निनाद आम्हाला भेटायला आला तर तो आमचा नाही आला तर तो भारतमातेचा अशी भावना मनाशी बाळगून आम्ही दिवस कंठत होतो. निनादने आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठं केलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असल्याची भावना बडगाम विमान दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या निनादच्या वडिलांनी बोलून दाखवली.

Story img Loader