Microplastics Found in Sugar And Salt : आपल्या जेवणामध्ये मीठ नसेल तर चव लागत नाही. तसंच गोड पदार्थामध्ये साखर महत्वाची असते. आपल्या रोजच्या आहारात हे दोन्हीही पदार्थ असतात. मात्र, आता एका अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँड्समध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील एक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला असून या अहवालाच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला असल्याचं इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.
या अहवालानुसार, भारतीय बाजारातील सर्वच मीठ आणि साखऱ्याच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत. मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर असा एक अभ्यास टॉक्सिक्स लिंक नावाच्या पर्यावरण संशोधन संस्थेने केला आहे. या अभ्यासामध्ये बाजारामधून पाच प्रकारची साखर आणि आणि १० प्रकारच्या मीठांची चाचणी करण्यात आली. यानंतर या संस्थेने या अभ्यासाचा हा अहवाल प्रसिद्ध केला.
या संस्थेने केलेल्या अभ्यासात असं समोर आलं की, छोट्या-छोट्या तुकड्यांच्या स्वरूपात मायक्रोप्लास्टिक असल्याचं यामध्ये दिसून आलं. या मायक्रोप्लास्टिकचा आकार हा ०.१ मिमी ते ५ मिमीपर्यंत असतो. एवढंच नाही तर साखरेचे मोठे ब्रँड असो किंवा छोटो ब्रँड असो तसेच मीठाचे छोटे ब्रँड असो की मोठे ब्रँड असो याबरोबरच पॅकेज केलेले किंवा विनापॅकेजवाले ब्रँड असो, या सर्वामध्येच मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना टॉक्सिक्स लिंकचे संस्थापक-संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितलं की, “आमच्या अभ्यासाचं उद्दिष्ट हे मायक्रोप्लास्टिक्सवरील वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणं हे होतं. जेणेकरून जागतिक प्लास्टिक करार या समस्येबाबत ठोस आणि केंद्रित पद्धतीने निराकरण करू शकेल. मायक्रोप्लास्टिक्स संदर्भातील धोके कमी करू शकणाऱ्या तांत्रिक हस्तक्षेपांकडे धोरणात्मक कारवाई करण्याबाबात संशोधकांचे लक्ष वेधून घेणं हेच अभ्यासाचं ध्येय होतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितलं की, “आमच्या अभ्यासामध्ये सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले. मात्र, हे मायक्रोप्लास्टिक्स मानवी आरोग्यावर परिणाम करू शकतात, त्यामुळे यावर आणखी व्यापक संशोधनाची गरज आहे.” दरम्यान, मिठाच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण ६.७१ ते ८९.१५ तुकडे प्रति किलो कोरड्या वजनाचे होते, असं टॉक्सिक्स लिंकने या अहवालात म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd