‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ पदान करण्यात आला. नडेला यांना विशेष सेवेसाठी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताचे वाणिज्यदूत डॉ. टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पद्म भूषण’ हा पुरस्कार आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया यावेळी सत्या नडेला यांनी दिली.
विश्लेषण : सत्या नाडेला यांनी गुंतवणूक केलेली अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट काय आहे?
भारतीयांसोबत काम करत तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी प्रगती करण्यास उत्सुक असल्याचे नडेला यांनी म्हटले आहे. ५५ वर्षीय सत्या नडेला भारत सरकारने जाहीर केलेल्या १७ पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. “हा पुरस्कार मिळवणाऱ्या विलक्षण लोकांमध्ये ओळखलं जाणं माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि जनतेचा आभारी आहे”, असे नडेला म्हणाले आहेत.
डॉ. टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सत्या नडेला यांनी भारताच्या विकासात डिजिटल तंत्रज्ञानांच्या योगदानाबाबत चर्चा केली. भारताच्या विकासाची वाटचाल आणि राजकीय, तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासंदर्भातही या बैठकीत दिग्गजांमध्ये चर्चा झाली. आपण ऐतिहासिक अशा आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान बदलाच्या युगात जगत आहोत, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर नडेला यांनी दिली. दरम्यान, सत्या नडेला पुढील वर्षी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
सत्या नडेला २०१४ पासून ‘मायक्रोसॉफ्ट’च्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. जून २०२१ मध्ये त्यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ‘पद्म’ पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनापूर्वी होत असते.