दिल्लीतील कार्यक्रमात मिर्झा गालिब यांच्या काव्यपंक्तींचा वापर

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला त्यांच्या संगणकशास्त्र आणि व्यवस्थापनातील कौशल्याबद्दल प्रसिद्ध आहेतच. पण सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती उद्धृत केल्या आणि उपस्थितांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका वेगळ्या पैलूची ओळख झाली.

नाडेला यांची ही तिसरी भारतभेट आहे. यावेळी त्यांनी नवी दिल्लीत मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या वतीने आयोजित ‘टेक फॉर गुड, आयडियाज फॉर इंडिया’ या कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी १९ व्या शतकातील इराणी कवी गालिब यांच्या ‘हजारो ख्वाईशें ऐसी की हर ख्वाईश पर दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, फिर भी कम निकले’ या काव्यपंक्तींचा वापर करत सांगितले की, संगणकशास्त्र आणि काव्य या दोनच आवडींनी त्यांच्या आयुष्यभरातील स्वप्नांमध्ये अधिराज्य गाजवले आहे. भारतातील सर्जनशीलता जगासाठी काव्य आणि तंत्रज्ञान दोन्ही देऊ शकते, असेही ते म्हणाले.

नाडेला यांनी अनेकदा संगणकाच्या सांकेतिक आज्ञाप्रणाली विकसित करणे आणि काव्य यांच्यातील साम्य दाखवून दिले आहे.

देशाच्या ‘डिजिटल इंडिया’ योजनेत मायक्रोसॉफ्ट कसे योगदान देऊ शकते आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञान विकसित करून देशाच्या प्रगतीत कसे हातभार लावू शकते हेही त्यांनी विशद केले.

नाडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच देशातील संगणकीकरणात मदत करण्याची इच्छा  व्यक्त केली.

Story img Loader