मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना करोनाची लागण झाली आहे. करोना पॉझिटिव्ह असले तरी सौम्य लक्षणे आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. आयसोलेट असून बरा होत नाहीत तोपर्यंत एकाकी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बिल गेट्स म्हणाले की, “मी भाग्यवान आहे की मला लसीकरण करण्यात आले आहे आणि मी बूस्टर देखील घेतला आहे आणि मला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे.”
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात प्रभावशाली खाजगी संस्थांपैकी एक आहे, ज्याची एकूण संपत्ती अंदाजे ६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. बिल गेट्स हे महामारी रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचे समर्थक आहेत. विशेषतः गरीब देशांमध्ये ते लोकांसाठी लस आणि औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.
गेट्स फाऊंडेशनने ऑक्टोबरमध्ये जाहीर केले आहे की, ते औषध निर्माते मर्कच्या अँटीव्हायरल कोविड १९ गोळीची जेनेरिक आवृत्ती कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणण्यासाठी १२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करेल.