Bill Gates Wealth: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि माजी सीईओ बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्याकडे सध्या १०१.२ बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. आपल्या मुलांसाठी यातली एक टक्केही संपत्ती सोडण्याचा त्यांचा विचार नाही. बिल गेट्स यांनी नुकतेच राज शमानी यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, माझ्या मुलांसाठी एक टक्केही संपत्ती सोडण्याची माझी इच्छा नाही. कारण ही वंशपरंपरागत पद्धतीने मिळालेली संपत्ती नाही.
बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांना एकूण तीन मुले आहेत. मुलगी जेनिफर गेट्स (२८), मुलगा रोरी जॉन गेट्स (२५) आणि मुलगी फिबी एडेल गेट्स (२२) अशी त्यांचे नावे आहेत. माझ्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतःचा खर्च भागवावा, यासाठी मी संधी दिली. माझे नशीब आणि आयुष्यात मिळालेल्या यशाचा त्यांच्या कर्तृत्वावर परिणाम होणार नाही, याचा प्रयत्न मी केला.
या पॉडकास्ट दरम्यान शमानी यांनी गेट्स यांना विचारले की, या निर्णयावर त्यांच्या मुलांनी काय प्रतिक्रिया दिली. त्यांनी नाराजी व्यक्त केली का? गेट्स म्हणाले, तुमच्या मुलांना असलेला तुमचा पाठिंबा आणि प्रेम याबद्दल त्यांच्या मनात कोणताही गोंधळ राहता कामा नये. त्यामुळेच या तत्त्वज्ञानाची माहिती त्यांना सुरुवातीलाच करून द्यावी, या मताचा मी आहे. त्यांना समान संधी प्राप्त करू द्यावी, असे माझे मत आहे. कारण फाऊंडेशनकडून अधिकतर मदत ही गरजूंना देण्यात येणार आहे.
बिल गेट्स पुढे म्हणाले की, त्यांच्या मुलांनाही फाऊंडेशनच्या कामाची कल्पना आहे आणि या कामावर त्यांनाही अभिमान वाटतो.
गेट्स यांची सर्वात लहान मुलगी फिबी एडेल गेट्स हीने काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिच्याकडे नेपो बेबी म्हणून पाहिले जाण्याची भीती व्यक्त केली होती. या विशेषाधिकाराची पार्श्वभूमी असल्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा खुलासा तिने केला होता. मला स्वतःची ओळख निर्माण करायची असल्याचे तिने सांगितले होते. २२ वर्षीय फिबी गेट्सने तिच्या आगामी फिया नामक प्रकल्पाचीही काही दिवसांपूर्वी घोषणा केली.