छप्रा येथील सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याप्रकरणी मृतांची संख्या २३ झाली आहे. विषबाधेच्या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी अनेक शाळांमधून माध्यान्ह भोजन घेण्यास नकार दिल्याचे  अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मीना देवी आणि त्यांचे पती फरार झाले आहेत. हे भोजन तयार करण्यासाठी मीना देवी यांच्या पतीच्या दुकानातून सामान खरेदी करण्यात आले होते. घटनेला दोन दिवस होऊनही अजून एकालाही अटक झालेली नाही.
मुख्याध्यापकांच्या विरोधात प्रथमदर्शी तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. राज्य प्रशासनाने तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. या भोजनातून विषबाधा झालेल्या २४ मुले आणि स्वयंपाक करणारी महिला यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ धर्मसती गंडवन खेडय़ातील ही  शाळा सुरू होऊ देणार नाही, असे राकेश्वर महातो यांनी सांगितले. त्यांची नात विषबाधेने मृत्युमुखी पडली. या ठिकाणी आमच्या मुलांची हत्या झाली, असे संतापलेल्या महातो यांनी सांगितले. मृत मुलांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शाळेच्या बाहेरच या मुलांचे दफन करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले.
ही घटना विषबाधेची नसून अन्न तयार करताना कीटकनाशके फवारलेल्या गहू आणि तांदळाच्या वापराने ही घटना घडल्याचे राज्याचे मुख्य सचिव अमरदीप सिन्हा यांनी सांगितले. याबाबत राज्याच्या न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली जात असून त्याबाबत उद्यापर्यंत अहवाल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या शाळेतील शिक्षक आणि आचाऱ्याने दर्जाबाबतचे नियम पाळले नसल्याचे बिहारच्या माध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संचालक आर. लक्ष्मणन यांनी सांगितले. विषबाधेच्या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी अनेक शाळांमधून माध्यान्ह भोजन घेण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
तामिळनाडूत १०० मुले आजारी
बिहारमधील माध्यान्ह भोजनातून विषबाधेची घटना ताजी असताना तामिळनाडूत १०५  मुलींना भोजनातून विषबाधा झाली. नेवेल्ली येथील शाळेत ही घटना घडली. सातवी आणि आठवीतील या मुली आहेत. अंडी खाल्ल्यानंतर काहींना उलटय़ांचा त्रास सुरू झाला, तर काही जणींना चक्कर आली. यानंतर हे वाटप तातडीने थांबवण्यात आले. या मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलींच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
मंत्र्यांच्या वाहनावर हल्ला
बिहारच्या सामाजिक न्यायमंत्री परवीन अमानुल्ला यांच्या वाहनाच्या ताफ्यावर वैशाली जिल्ह्य़ात संतप्त जमावाने हल्ला केला आणि त्यांना काही काळ रोखून धरले. माध्यान्ह भोजनातून २४ मुलांच्या मृत्यूच्या निषेधार्थ निदर्शने सुरू होती. पाटण्याहून त्या मुजफ्फरपूरकडे जात असताना जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या घटनेमुळे १५ मिनिटे त्या अडकून पडल्या. अखेर पोलिसांनी निदर्शकांना पांगवले. मात्र या घटनेमुळे त्यांना नियोजित कार्यक्रमाला न जाता पाटण्याला पुन्हा परतावे लागले.