हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे फायटर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.  दुपारी एकच्या नंतर हा अपघात झाला. पंजाब पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरुन या विमानाने उड्डाण केले होते.

घटनास्थळावर शेतामध्ये विमानाचे अवशेष विखरुन पडल्याचे दिसत आहे. मिग-२१ हे हवाई दलातील सर्वात जुने विमान आहे. साठच्या दशकात या विमानाचा वायू दलात समावेश करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी मिग-२१ विमानांचे सातत्याने अपघात होत होते. त्यामध्ये आपण आपले अनेक कुशल वैमानिक गमावले. त्यामुळे मिग-२१ विमाने टप्प्याप्याने निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने रशियाकडून ही विमाने विकत घेतली होती.

मागच्या दोन महिन्यात हवाई दलाचे दुसरे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. गुजरातच्या कच्छमध्ये जॅग्वार विमान कोसळून झालेल्या अपघातात वरिष्ठ एअर कमांडरचा मृत्यू झाला होता. कांगडा जिल्ह्यातील जावळी भागातील पाट्टा जातियान गावात हे विमान कोसळले.