राजस्थानच्या जोधपूर येथे सोमवारी भारतीय वायूदलाचे मिग-२७ हे लढाऊ विमान एका घरावर कोसळल्याची दुर्घटना घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिकांना सुरक्षितपणे बाहेर निघण्यात यश आले. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, विमान कोसळले त्या परिसरातील दोन घरांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. हवाईतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच विमान कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हवेत उड्डाण केल्यानंतर वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली होती, असे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित परिसर रिकामा करण्यात आला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Story img Loader