वृत्तसंस्था, जेरुसलेम, गाझा

इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यापूर्वी गाझा पट्टीतून १० लाखांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांनी घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केले आहे. तर इस्रायलच्या जमिनीवरील कारवाईमुळे मानवतावादी संकट अधिक तीव्र होऊ शकते, असा इशारा युद्धभागात मदत पुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे. अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनीही याबद्दल आता चिंता व्यक्त केली आहे.  

दुसरीकडे, सामान्य लोक तसेच रुग्णालयांसाठी पाठवण्यात आलेली मदतसामग्री इजिप्तच्या सीमेवर अडकून पडली आहे. इस्रायली सैन्याच्या वेढय़ामुळे ही मदतसामग्री गरजूंपर्यंत पोहोचवायची कशी हा प्रश्न आहे. गाझामधील संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयस्थानांमधील पाणी संपले आहे. रुग्णालयांमध्ये इंधन संपल्यानंतर जनरेटर बंद पडून मोठय़ा प्रमाणात रुग्ण मरण पावतील अशी भीती डॉक्टरांना वाटत आहे.

हेही वाचा >>>पूर्वेकडील राज्यांमध्ये ‘हरित पर्यटना’द्वारे जबाबदार पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचा पुढाकार!

हमासला मोडून काढण्यासाठी एक व्यापक मोहीम आखण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. तर, इस्रायलने सातत्याने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतरही हमासचे हल्ले थांबवण्यात इस्रायलला यश आलेले नाही. हे युद्ध दोन्ही बाजूंनी लढल्या गेलेल्या पाच गाझा युद्धापैकी सर्वात भीषण युद्ध ठरले असून त्यामध्ये आतापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. गाझामध्ये २,७०० पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत आणि ९, ७०० लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये झालेल्या प्राणहानीचा आकडा १,४००पेक्षा जास्त आहे.

पॅलेस्टाईनसाठीही मार्ग हवा – बायडेन

हमास या संघटनेचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे, मात्र त्याचवेळी पॅलेस्टाईन राज्यासाठी मार्ग असला पाहिजे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी व्यक्त केले. या संघर्षांमध्ये इस्रायल युद्धाचे नियम पाळेल अशी आशाही बायडेन यांनी ‘६० मिनिट्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. या युद्धामध्ये अमेरिकेने आपले सैन्य पाठवणे आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम आशियाई देशांमधील अशांततेमुळे अमेरिकेत दहशतवादाचा धोका वाढल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, बायडेन येत्या काही दिवसांमध्ये इस्रायलचा दौरा करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तारीख निश्चित झालेली नाही.

हेही वाचा >>>जागतिक भूक निर्देशांकात भारत १११व्या स्थानी, हा निर्देशांक नेमका काय असतो? कसा मोजला जातो?

गाझामध्ये १९९ ओलीस – इस्रायल

हमास आणि इतर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझामध्ये १९९ जणांना ओलीस धरल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. आधी हा आकडा १५० च्या आसपास असल्याचे सांगितले जात होते. याबद्दल संबंधित कुटुंबीयांना कळवण्यात आल्याचे सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र, त्यामध्ये परदेशी नागरिकांची संख्या किती आहे ते त्यांनी सांगितले नाही.

इराणच्या दाव्याला हमासकडून पुष्टी नाही

इस्रायलने हवाई हल्ले थांबवले तर हमास ओलिसांची सुटका करायला तयार आहे, असा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी करण्यात आला. मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी तेहरानमधील पत्रकार परिषदेत यासंबंधी वक्तव्य केले. हमासने मात्र असा कोणताही प्रस्ताव दिल्याचे मान्य केले नाही.

हेही वाचा >>>गावाकडच्या मुलीने नाकारली ३२ लाखांची ऑफर, Google ने विद्यार्थिनीला दिली ‘इतक्या’ भरगच्च पॅकेजची ऑफर

ब्लिंकन पुन्हा इस्रायलमध्ये

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन एका आठवडय़ाच्या कालावधीत दुसऱ्यांदा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. ब्लिंकन यांनी सहा अरब देशांमधील नेत्यांशी युद्धाविषयी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्यासाठी ते पुन्हा इस्रायलला गेले आहेत. ब्लिंकन यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये इस्रायलच्या संभाव्य कारवाईनंतर पॅलेस्टिनी लोकांवर ओढवणाऱ्या संकटाविषयी अरब देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

युद्ध पसरू नये यासाठी प्रयत्नशील -सुनक

युद्ध पसरू नये यासाठी जगभरातील नेत्यांबरोबर चर्चा करत असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले आहे. त्यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि लंडनमध्ये जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. कोणालाही हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरायला नको आहे असे ते म्हणाले. हमासशी लढताना सर्वसामान्यांना फटका बसू नये असा मुद्दा नेतान्याहू यांच्याकडे उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.

इजिप्तची सीमा उघडण्याची प्रतीक्षा

गाझा आणि इजिप्तला जोडणारी राफा सीमेवर दुहेरी नागरिकत्व असलेले पॅलेस्टिनी नागरिक मोठय़ा प्रमाणात जमले असून ते सीमा उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. इस्रायलचा हवाई हल्ला सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आलेली सीमा एका आठवडय़ापेक्षा जास्त काळ झाल्यानंतरही इजिप्त खुली करत नसल्यामुळे लोकांमधील अस्वस्थता वाढत आहे. दुसरीकडे गाझा पट्टीतील लोकांसाठी आलेली मदत इजिप्तच्या बाजूला अडकून पडली आहे.

युद्धात न पडण्यासाठी लेबनॉनची धडपड

लेबनॉनच्या दक्षिणेला इस्रायलबरोबरच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आणि नवीन युद्धामध्ये ओढले न जाण्यासाठी आपली धडपड सुरू असल्याचे काळजीवाहू पंतप्रधान नजिब मिकाती यांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि ब्रिटन, फ्रान्स, तुर्की, कतार, जॉर्डन आणि इटलीचे राष्ट्रप्रमुख आणि राजनैतिक अधिकाऱ्यांशी फोनवरून संभाषण केले आहे. आम्ही एका कठीण परिस्थितीमध्ये असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader