एक्स्प्रेस वृत्तसंस्था, नवी दिल्ली : :केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्यातील कलम ३७० हटविल्यानंतर आणि या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांनी स्थलांतर केलेले नाही, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली. या काळात काश्मीर खोऱ्यात २१ बिगरमुस्लीम नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याचीही माहिती सरकारने दिली.५ ऑगस्ट २०१९ पासून ९ जुलै २०२२ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे १२८ कर्मचारी आणि ११८ नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. ११८ नागरिकांपैकी पाच काश्मिरी पंडित होते, तर १६ अन्य समुदायाचे होते. या दरम्यान एकाही यात्रेकरूची हत्या करण्यात आलेली नाही, त्याचबरोबर एकाही काश्मिरी पंडिताने स्थलांतर केलेले नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंदराय यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
पंतप्रधान विकास निधीच्याअंतर्गत जम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या विविध विभागांत ५,५०२ काश्मिरी पंडितांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्मिरी पंडितांनी स्थलांतर केले नाही, असे राय यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात कुलगाम जिल्ह्यत दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षकाची हत्या केली होती. त्यावेळी काश्मीर पंडितांच्या कर्मचारी संघटनेने जर सरकारने सुरक्षा पुरवली नाही तर काश्मीर खोरे सोडण्याची धमकी दिली होती़ त्यावेळी सरकारने खोऱ्यातील सर्व निर्वासितांच्या सुरक्षेसाठी शक्य ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.