करोनातून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी घेतला. त्यानुसार, अतिसौम्य-सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल. फक्त गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभर करोनाच्या रुग्णांची संख्या सुमारे ६० हजार झाली असून गंभीर रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, जून-जुलैमध्ये करोनाच्या प्रादुर्भावाचे शिखर गाठले जाऊ  शकते. त्यामुळे येत्या काळात करोनाचे रुग्ण अधिक वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात दररोज ९५ हजार नमुना चाचण्या करण्याची क्षमता आहे. ती १.२० लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी नमुना चाचणी संच उपलब्ध व्हावेत यासाठी गरज असेल तरच त्यांचा वापर करण्याचे धोरण केंद्राने अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून अतिसौम्य, सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांना घरी सोडण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

आता सलग तीन दिवस ताप नसेल, श्वास घेताना त्रास होत नसेल वा अन्य कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर अतिसौम्य, सौम्य, मध्यम तीव्रतेच्या रुग्णांना दहा दिवसांच्या उपचारांनंतर घरी पाठवले जाईल. त्यांना पुढील सात दिवस घरी विलगीकरणात राहावे लागणार आहे. पण तीन दिवसांमध्ये रोगाची लक्षणे कायम राहिली, रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागत असेल, तर मात्र रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांची पुन्हा नमुना चाचणी केली जाईल. त्यात रुग्ण करोनामुक्त आढळले तरच त्यांना घरी पाठवले जाईल.

या बदलापूर्वी अतिसौम्य, सौम्य, मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना किमान दोन चाचण्या केल्यानंतर घरी पाठवले जात असे. घरी गेल्यानंतर १४ दिवसांनी वैद्यकीय यंत्रणा दूरध्वनीवरून रुग्णाच्या तब्येतीची चौकशी करतील. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे पुन्हा आढळल्यास या रुग्णांनी आरोग्य केंद्राशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क साधणे गरजेचे आहे.

अतिसौम्य व सौम्य लक्षणे

* सलग तीन दिवस ताप नसेल व श्वास घेण्यास त्रास नसेल तर १० दिवसांनी रुग्णालयातून विनाचाचणी घरी सोडले जाईल. सात दिवस घरी विलगीकरण.

 मध्यम लक्षणे

* तीन दिवसांनंतर कोणत्याही लक्षणाचा अभाव असेल आणि त्यानंतरच्या चार दिवसांनंतर रक्तात ऑक्सिजनची ९५ टक्के मात्रा कायम राहात असेल तर, म्हणजेच ऑक्सिजन देण्याची गरज भासत नसेल तर १० दिवसांनंतर विनाचाचणी घरी जाण्याची परवनागी दिली जाईल. सात दिवस घरी विलगीकरण गरजेचे असेल.

* तीन दिवसांनंतरही ताप कमी झाला नसेल आणि ऑक्सिजनची गरज लागत असेल तर अशा रुग्णांना त्यांची लक्षणे संपेपर्यंत रुग्णालयात राहावे लागेल. त्यानंतर ताप व ऑक्सिजनची मात्रा याबाबत समाधानकारक प्रगती झाली तरच घरी सोडले जाईल. या रुग्णांनाही विनाचाचणी रुग्णालयातून जाण्याची मुभा असेल.

गंभीर लक्षणे

* एचआयव्हीग्रस्त, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग आदी करोनाबाधित रुग्णांना घरी सोडताना अधिक काटेकोर वैद्यकीय नियमांचे पालन केले जाईल. ताप नसेल, ऑक्सिजनची मात्रा कायम राहात असेल तर रुग्णांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. मात्र हे रुग्ण करोनामुक्त झाल्याची नमुना चाचणीद्वारे खात्री करून घेतली जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mild moderate intensity patient untested at home abn