लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसपक्षातून आता विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सल्ला देणाऱयांमुळे पक्षाला लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खावा लागला असल्याचे मत दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.
निवडणूकीतील पराभवाचे खापर केवळ राहुल गांधी यांच्यावर फोडून चालणार नाही. या पराभवाला अनेक जण कारणीभूत आहेत असे मिलिंद देवरा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
देवरा म्हणाले की, “ज्यांना निवडणूकीचा अनुभव नाही, पक्षात मान नाही, स्थान नाही अशा लोकांच्या सल्ल्यामुळे पक्षावर ही परिस्थिती ओढावली आहे. अशा लोकांचाच भरणा पक्षात महात्वाच्या पदांवर आहे आणि तेच पक्षातील महत्वाच्या निर्णयात सहभागी होते. त्यामुळे या पराभवासाठी केवळ राहुल गांधींना जबाबदार धरून चालणार नाही. कसलाही अनुभव नसणाऱयांना पक्षात महत्वाच्या कामांसाठी नेमण्यात आले आमच्यासारख्या निवडणुकीचा अनुभव असणाऱयांच्या मताकडे पक्षाने कानाडोळा केला.” असा दावाही देवरा यांनी केला. 
तसेच “अनेक अनुभवी नेत्यांना दूर ठेवण्यात आले आणि त्यांनी मांडलेल्या मतांवर पक्षातून प्रतिसादाचा अभाव होता हे माझ्यासोबत पक्षातील अनेक जण या गोष्टीशी सहमत असतील. अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली परंतु, पक्षाच्या हायकमांडला या निवडणुकीत सल्ला देणाऱया प्रत्येकानेही पराभवाची जबाबदारी स्विकारायला हवी.” असेही देवरा कोणाचेही नाव न घेता म्हणाले म्हणालेत. 
केवळ काँग्रेसची प्रचार प्रणाली या निवडणूकीत चुकची ठरली असे वाटत नाही. माझ्या मते पक्षातील समन्वय, संपर्क, पक्ष आणि प्रशासनातील समन्वय या सर्व बाबतीत गेल्या तीन वर्षांपासून पक्षाची भूमिका चुकीची राहीली आहे. विचारल्या गेलेल्या प्रश्नांना पक्षातून संथ प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे प्रचारातही या संथपणाला सामोरे जावे लागले असेही देवरा यांनी स्पष्ट केले. 
 

Story img Loader