लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींच्या राजकीय सल्लागारांवर जाहीर टीका करणारे दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा यांची वरिष्ठ नेत्यांकडून कानउघाडणी करण्यात आली.  
यशामध्ये अनेक भागीदार असतात, मात्र अपयश नेहमीच पोरकं असतं. निवडणुकीतील पराभवासाठी सध्या काही जणांकडून काँग्रेसच्या विशिष्ट नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, निकालापूर्वी या काँग्रेस नेत्यांच्याबाबतीत टीका करणाऱ्यांना कोणताच आक्षेप नव्हता. टीका करणारे लोक तरूण आहेत, अशाप्रकारच्या पराभवाचा पहिल्यांदाच सामना करत आहेत. त्यांनी या पराभवातून काही तरी शिकले पाहिजे असे सांगत दिग्विजय सिंह यांनी नाव न घेता मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला. याबद्दल अधिक विचारले असता दिग्विजय सिंह यांनी आपल्याला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, मात्र राहुल गांधींच्या सल्लागारांवर टीका करणारे लोक ई-मेल्स आणि मेसेजच्या माध्यमातून नियमितपणे राहुल यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या युवा ब्रिगेडपैकी एक युवा काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनीसुद्धा देवरा यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, आजवर मिलिंद देवरा हे राहुल गांधींच्या निकटवर्तीयांपेक्षा एक आहेत असे आपल्याला वाटत असल्याचे सांगत देवरांना अप्रत्यक्ष टोला हाणला. तसेच आपण निदान आपला मतदारसंघ तरी राखला असे राजीव सातव यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी लोकसभेतील पराभवासाठी एकटे राहुल गांधींना जबाबदार नसून त्यांच्या राजकीय सल्लागारांमुळे ही वेळ ओढवल्याचे देवरा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. तसेच निवडणुकांचा कोणताही अनुभव आणि वास्तवाचे भान नसणाऱ्या लोकांकडे निवडणुकीच्या प्रचाराची सुत्रे सोपवण्यात आल्याने लोकसभा काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगत मिलिंद देवरा यांनी राहुल गांधी यांच्या राजकीय सल्लागारांवर निशाणा साधला होता.

Story img Loader