इराकमध्ये अराजकाची अवस्था कायम असून दहशतवाद्यांनी इराकच्या मोठय़ा तेलशुद्धीकरण कारखान्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला. दरम्यान इराकच्या पंतप्रधानांनी पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात काही सुरक्षा कमांडरना काढून टाकून राजकीय विरोधकांशी संधान बांधण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिका आता इराकवर हवाई हल्ले करण्याचा विचार करीत असून बगदादच्या सुरक्षा दलांचा या हल्ल्यांना विरोध आहे. इराणने इराकमधील शीया धर्मस्थाने सुन्नी-अरब दहशतवाद्यांच्या हाती पडू नयेत, असा चंग बांधला आहे. अमेरिकेने त्यांच्या बगदादमधील दूतावासाभोवती २७५ लष्करी जवान तैनात केले आहेत. इतर काही देशांचे नागरिक व राजनीतीज्ञ तेथे अडकून पडले असून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इराकमधील अराजकामुळे अनेक लोक विस्थापित झाले असून बुधवारी बायजी तेल कारखाना दहशतवाद्यांनी ताब्यात घेतला त्यामुळे तेलाचे भाव आणखी वाढले आहेत. सलाहेदीन प्रांतात असलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याच्या परिसरात जोरदार धुमश्चक्री झाली. तेल भांडारगृहांना आग लागली. इराकमधील हा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. नंतर हा कारखाना बंद करून कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
जगातील तेल उत्पादक आता इराकमधील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या इराक २५ लाख बॅरल तेल रोज निर्यात करतो पण आता तेथील तेलसाठय़ांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. दक्षिणेकडील बसरा तेल कारखाना सुरळीत सुरू आहे. पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी काही वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना काढून टाकले व ते आता विरोधकांच्या हातचे बाहुले बनण्याची शक्यता आहे. निनेवेह प्रांतातील कमांडरला त्यांनी काढून टाकले असून कोर्ट मार्शलचे आदेश दिले आहे.
‘प्रार्थनास्थळांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न’
बगदाद सरकारविरोधात लढणाऱ्या सुन्नी पंथीयांच्या हल्ल्यातून इराकमधील शिया पंथीय मुस्लिमांची प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिलेली नाहीत, परंतु या पवित्र स्थळांच्या संरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास आपले सरकार तयार असल्याचे आश्वासन इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी बुधवारी दिले. करबाला, नजफ कादिमिया आणि समारा ही आमची अत्यंत पवित्रस्थळे आहेत आणि त्यांच्यावर कोण्या सरकारचा, त्यांच्या सेवकांचा आणि दहशतवाद्यांचा हात उगारला जाणार असेल तर त्यांनी ध्यानात ठेवावे की, आमचा प्रत्येक श्रद्धावान इराणी नागरिक प्रार्थनास्थळांच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढेल, असे रौहानी म्हणाले.
मोठा तेलप्रकल्प अतिरेक्यांच्या ताब्यात
इराकमध्ये अराजकाची अवस्था कायम असून दहशतवाद्यांनी इराकच्या मोठय़ा तेलशुद्धीकरण कारखान्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला.
First published on: 18-06-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militants attack iraqs main oil refinery officials