सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याच्या इराद्याने तालिबान्यांनी रविवारी मध्यरात्री कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या सशस्त्र हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरला. दहशतवादी हल्ल्यात १२ दहशतवाद्यांसह २८ जण ठार झाले. तब्बल १३ तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्यांचा पाडाव करण्यात लष्कराला यश आले.
दरम्यान, ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बॉम्ब आणि गोळ्यांच्या मदतीने निष्पाप जिवांचा बळी घेऊन पाकिस्तान सरकारला आम्ही जिवंत आहोत, हे दाखवून दिले आहे, अशी दर्पोक्ती संघटनेचा म्होरक्या शहिदुल्लाह शहीद याने केली आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा माजी म्होरक्या हकिमुल्लाह मेहसूद यांच्या हत्येचा हा बदला असल्याचे त्याने स्पष्ट केले. पाकिस्तानातील तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि सरकार यांच्यात शांतता बोलणी फिसकटल्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लष्करी वेषातील दहशतवाद्यांनी विमानतळाच्या इमारतीत प्रवेश केला. या वेळी त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांमधून विमानतळ कर्मचारी, तसेच प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात सैनिक, अभियंते, कर्मचारी आणि पोलीस ठार झाले. दहशतवाद्यांनी काही ठिकाणी स्फोटकांचा वापर केल्याने काहीजण जखमी झाले, तर इमारतीचे नुकसान झाले.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला.
शांती भंग करण्यासाठी संघटनेने केलेला हा हल्ला म्हणजे भ्याडपणा आहे. देशाची प्रमुख सरकारी केंद्रे उद्ध्वस्त करून जनतेत अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु आमच्या लष्कराने तो हाणून पाडला, असे ते म्हणाले.
मे २०११ मध्ये या संघटनेने मेहरन नौदल हवाईतळावर असाच हल्ला केला होता, त्यात १५ दहशतवादी सामील होते, त्यांनी १८ जणांना ठार केले होते. या वेळी त्यांनी बदल्याची भाषा केली होती.
कराची विमानतळावर दहशतवादी हल्ल्यात २८ ठार
सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याच्या इराद्याने तालिबान्यांनी रविवारी मध्यरात्री कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या सशस्त्र हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2014 at 12:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militants attack jinnah international airport in karachi 28 dead including all 12 attackers