पाकिस्तानच्या उत्तरेकडील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रशिक्षिण हवाई तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा हवाला देत हल्ल्याला प्रत्युत्तर देताना तीन हल्लेखोर ठार झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. तीन हल्लेखोर अजूनही तळाच्या आत सक्रिय असल्याचेही वृत्तात म्हटलं आहे.
शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या मियांवली भागातील हवाई तळात शिरण्यासाठी आत्मघातकी हल्लेखोर शिडी चढून आत शिरले. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. त्यांच्याकडून हल्ल्याला सुरुवात होताच पाकिस्तानी लष्करानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, तालिबानशी संबंधित तेहरिक-ए-जिहाद या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला असून क्लिअरन्स ऑपरेशन सुरू आहे, असे वृत्तात म्हटले आहे. या हल्ल्यात हवाई दलाच्या तळाच्या आत उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली आहेत. वित्तहानी झाली असली तरीही हा दहशतवादी हल्ला अपयशी ठरला असल्याचं पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे.
दरम्यान, देशातील दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरता पाकिस्तानी सशस्त्र दल कटिबद्ध आहे, असंही पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे. काही तासांपूर्वी बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.