इजिप्तमध्ये लष्कराच्या तपासणी नाक्यांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ६० सैनिक ठार झाले आहेत. आत्मघाती बॉम्बर, शस्त्रास्त्रे यांच्या मदतीने सिनाई द्वीपकल्पाच्या उत्तर भागात हे हल्ले करण्यात आले आहेत. लष्कर व पोलिसांनी हल्लोखोरांचा शोध चालू केला आहे. पायदळ व लष्करी दले त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. उत्तर सिनाई येथे शेख झुवेद शहरात हल्ला झाला त्यात आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला, तसेच शस्त्रेही वापरण्यात आली, त्यामुळे तपासणी नाक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान सत्तर अतिरेक्यांनी पाच सुरक्षा नाक्यांवर एकाचवेळी उत्तर सिनाई येथे हल्ला केला, असे ब्रिगेडियर जनरल महंमद समीर यांनी फेसबुकवर म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक सैनिक ठार झाले असून आतापर्यंतचा आकडा दहा असावा असा त्यांचा अंदाज आहे. या हल्ल्यात २२ अतिरेकी ठार झाल्याचे त्यांनी सांगितले. इजिप्तचे महाधिवक्ता हिशाम बराकत यांचा कार बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर हे हल्ले करण्यात आले असून अब्देल फताह अल सिसी यांनी बंडखोरांवर कारवाई सुरू केल्याने त्याचा सूड घेण्याचा त्यामागे उद्देश आहे. इजिप्तच्या उत्तर सिनाई भागात  जानेवारी २०११ पासून हिंसक हल्ले करण्यात आले असून त्यात पोलिस व लष्कराला लक्ष्य करणारे हल्ले पदच्युत अध्यक्ष महंमद मोर्सी यांच्या २०१३ मधील हकालपट्टीनंतर वाढले आहेत. आतापर्यंत एकूण ६०० सुरक्षा जवान हल्ल्यात मारले गेले आहेत. आताच्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. गाझा पट्टय़ाकडे जाणाऱ्या बोगद्यांच्या भागातही शोध घेतला जात आहे.

Story img Loader