नियंत्रण रेषा ओलांडून सुरनकोटमार्गे मुगल रोडने काश्मीर खोऱ्यात जाताना दहशतवाद्यांसाठी हिल काका नंदनवन झाले होते. त्यामुळेच नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भागात दहशतवाद्यांनी प्रमुख अड्डा बनवला होता. महिलांवर अत्याचार, निष्पापांची हत्या नित्याचे झाले होते. या भागातील बहुसंख्य गुज्जरांनी अखेर दहशतवादाविरुद्ध आवाज उठवून लष्कराच्या मदतीने ‘ऑपरेशन सर्प विनाश’ राबवून या दहशतवाद्यांची पाळेमुळे उखडली.
या दहशतवादाविरुद्धच्या लढय़ाच्या आठवणी आजही कुलाली आणि हिल काका गावातील नागरिकांमध्ये ताज्या आहेत. या भागात ७०० वर दहशतवादी होते. महिलांवर अत्याचार करत होते. त्याविरोधात गावातील हाजी मोहंमद आरिफ पुढे आला. त्याला दहशवाद्यांनी ठार केले. त्यावेळी आरिफचा भाऊ ताहिर चौधरी सौदी अरेबियात मार्बल व्यवसाय करत होता. त्याला हे कळल्यावर तो परतला आणि प्रचंड संतापलेला होता. त्याने आपल्या भावाचा बदला घेण्याची खूणगाठ बांधली. त्यासाठी व्हिलेज डिफेन्स कमिटी स्थापन करून १०० युवकांना सदस्य केले, परंतु शस्त्र नव्हती. मग त्याने भारतीय लष्कराला विनंती केली. लष्कराने ‘व्हीडीसी’च्या सदस्यांना प्रशिक्षण दिले. मार्च २००३ मध्ये रोमिओ ऑफ ६ सेक्टर, राष्ट्रीय रायफलने ‘ऑपरेशन सर्प विनाश’ सुरू केला. हिल काका परिसरातील दहशतवाद संपण्यासाठी सुरुवात झाली ते २१ एप्रिल २००३ च्या रात्री. यात १३ दहशतवादी ठार झाले, तर २० पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पीर पंजालमार्गे ते काश्मीर खोऱ्यात जाणार होते. आम्ही त्यांना ठार केले, तर सुमारे ७२ दहशतवादी पकडले गेले. मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आले. २५ किलो मटन सापडले होते.
दहशतवाद्यांनी या भागात दुमजली १८ खाटांचे रुग्णालय बांधले होते. हिंदुस्थान आमचा आहे. त्यामुळे आम्ही हा लढा दिला. आम्ही काही उपकार केले नाही, परंतु आता आम्हाला विकास हवा आहे. यासाठी बफ्लियाज ते कुलाली आणि हिल काकापर्यंत पक्का रस्ता होणे आवश्यक आहे, असे या ऑपेशन सर्प विनाशमध्ये गावकऱ्यांकडून महत्त्वाची भूमिका बजावणारे ताहिर चौधरी म्हणाले. दहशतवाद्यांचा सामना करणारे अनेक नागरिक येथे आहेत. गेल्या दशकभरापासून येथे शांतता नांदत असून भारतीय लष्कराच्या मदतीने शाळा, सामाजिक भवन, आरोग्य शिबीर, स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शांतेत विकास होतो आणि त्यामुळे जीवन समृद्ध होते, यावर त्यांच्या पक्का विश्वास बसला असून त्यांनी आता पक्का रस्ता झाला पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे, आम्ही हिंदुस्थानला समर्थन देतो, भारतीय लष्कराला मदत करतो म्हणून आम्हाला जम्मू-काश्मीर सरकार गृहीत धरते. सर्वाधिक विकास निधी काश्मीर खोऱ्यात खर्च केला जातो. आमच्या भागाला दुर्लक्षित केले जाते, असा आरोपही ताहीर चौधरी यांनी केला.
हवी विकास वाट..
ऑपेशन सर्प विनाश राबवताना सैन्यदलाने बफ्लियाज ते कुलाली आणि मडा दरम्यान रस्ता कच्चा रस्ता तयार केला. येथून जवळच हिल काका आहे. हा कच्चा रस्ता पक्का करण्यात यावा. यामुळे या भागात रहदारी वाढून विकास होईल. उपजिविकेच्या साधनात वाढ होईल. बाजारपेठ विकसित होईल, असे येथील गावकऱ्यांना वाटते. या गावकऱ्यांना पायाभूत सुविधा आणि विकासासाठी आग्रह, हे लष्कराच्या मोहिमेचे यशच म्हणावे लागेल. हिल काका, कुलाली या भागात दहशवाद्यांचे उच्चाटन झाले, परंतु येथील जनसमस्या काही संपलेल्या नाहीत. अत्यंत दुर्गम भागातील नागरिकांना आता पायाभूत सुविधा हव्या आहेत. बफ्लीयाज येथील लोकांना हा रस्ता होऊ नये, असे वाटते. कारण, त्यामुळे त्यांची मार्केटवरील पकड सैल होईल, अशी त्यांना भीती वाटते, असा आरोपही ताहीर चौधरी यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनी अनेक आश्वासने दिली, परंतु आम्हाला चांगला रस्ता हिल काका ते बफ्लियाजला जोडणारा रस्ता मिळाला नाही, याचे दुख आहे, असे मोहंमद फारुख म्हणाले.