उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथे दोन बहिणींवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे देशभर वातावरण तप्त झाले असतानाच सुदूर मेघालयात बदायूँ घटनेलाही मागे टाकेल, असे नृशंस कृत्य अतिरेक्यांनी केले. आपली वासना पुरविण्यास नकार देणाऱ्या एका गृहिणीला या अतिरेक्यांनी तिच्या घराबाहेरच आणि मुलांच्या समोर तिच्या चेहऱ्यावर एके रायफलीतून गोळ्यांचा वर्षांव करीत ठार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघालयातील दक्षिण गारो हिल जिल्ह्य़ात हा नृशंस प्रकार घडला. ही ३५ वर्षीय महिला पती व ५ मुलांसमवेत घरी असताना मंगळवारी सायंकाळी ६.०० च्या सुमारास ‘गारो नॅशनल लिबरेशन आर्मी’चे (जीएनएलए) अतिरेकी घरात घुसले. त्यांनी मुले व पतीला घरात कोंडले आणि महिलेला जबरदस्तीने घराबाहेर काढले. अतिरेक्यांनी तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने त्यास कडाडून विरोध केल्यावर त्यांनी आपल्याकडील स्वयंचलित एके रायफलीने तिच्या चेहऱ्यावर अगदी जवळून गोळ्यांचा वर्षांव केला. हा गोळीबार एवढा भीषण होता तिचा चेहरा अक्षरश: छिन्नविछिन्न झाला होता.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा गारो हिल क्षेत्राचे खासदार पी. ए. संगमा यांनी तीव्र निषेध केला आहे. गारो हिलची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे. आपण हे प्रकरण केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या निदर्शनास आणणार आहोत, असेही संगमा यांनी सांगितले.
मेरठमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
शेजारी आणि त्याच्या मित्राने मिळून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना येथे घडली. सोमवारी रात्री पीडित मुलगी एकटीच असताना आरोपी विपीन आणि त्याचा मित्र तोते ऊर्फ ईश्वर या दोघांनी तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला सकाळपर्यंत ओलिस ठेवले. मुलीने सर्व हकिकत आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी टीपीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
 पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले.

Story img Loader