पेशावरमधील सरकारी इमारतीमध्ये करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात चार जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याच हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत, पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
खैबर हाऊस असे नाव असलेल्या सरकारी इमारतीमध्ये सोमवारी सकाळी स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि त्यानंतर तुफान गोळीबार करण्यात येऊ लागला. दहशतवाद्यांनी एकूण दोन स्फोट केले. हल्लेखोर लष्करी गणवेश घालून आले होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्ल्यावेळी खैबर हाऊसमध्ये काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू होती. एका आत्मघाती दहशतवाद्यांनी जिथे बैठक सुरू होती, तिथे येऊन स्वतःला पेटवून घेतले, असे पाकिस्तानातील तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इकबाल खान यांनी सांगितले. दुसऱया आत्मघाती दहशतवाद्यावर सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात चार सुरक्षारक्षकांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर तातडीने लष्कराच्या जवानांनी संपूर्ण इमारतील वेढा घातला असून, तेथील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. इमारतीचे सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली असून, तेथील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
(संग्रहित छायाचित्र) 

Story img Loader