उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या वादाला आता नवं वळण लागलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका ट्विटद्वारे अमेरिकचं सैन्य उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी सज्ज झाल्याचा इशारा दिला आहे. निदान आता तरी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग काहीतरी पर्याय स्वीकारतील अशी अपेक्षा आहे असंही ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे, आता प्योंगयांग या उत्तर कोरियाच्या राजधानीवर हल्ला करण्याचा सज्जड दमच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
Military solutions are now fully in place,locked and loaded,should North Korea act unwisely. Hopefully Kim Jong Un will find another path!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 11, 2017
प्योंगयांगनं अमेरिकेला धमक्या देणं थांबवलं नाही तर आता उत्तर कोरियावर असा हल्ला करू. हा हल्ला असा असेल जो जगात कोणीही पाहिला नसेल हे याद राखा! असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या सैन्यानं आपली हत्यारं सज्ज ठेवली आहेत आणि हल्ल्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे, निदान आता तरी उत्तर कोरिया कोणताही मूर्खपणा करणार नाही अशी किमान अपेक्षा आम्हाला आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
‘वॉशिंग्टन पोस्ट’नं दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाकडे ६० अण्वस्त्रे आहेत. यामधील काही अण्वस्त्रांचा आकार हा मोठा तर काहींचा छोटा आहे, तसंच काही अण्वस्त्रं लांब पल्ल्याची आहेत, असंही वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. तर उत्तर कोरियानं काही दिवसांपूर्वी अंतर्महाद्विपीय बॅलेस्टिक क्षेपणस्त्राचीही चाचणी केली होती अशी माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयानं दिली होती. तसंच उत्तर कोरियानं छोट्या आकाराची अण्वस्त्र तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित केलं असावं अशीही शक्यता जपानकडून व्यक्त करण्यात आली होती. आमच्याकडे असलेल्या आधुनिक शस्त्रांद्वारे आणि अण्वस्त्रांद्वारे आम्ही अमेरिकेलाही लक्ष्य करू शकतो असा दावा उत्तर कोरियाकडून करण्यात आला होता.
प्योंगयांगमध्ये ज्या अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या त्याला अमेरिकेनं विरोध केला होता. तसंच या चाचण्यांची मोहिम मागे घेतली जावी असं अमेरिकेनं म्हटलं होतं, मात्र अमेरिकेची ही मागणी उत्तर कोरियानं धुडाकवून लावली. तसंच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या धमक्याही थांबल्या नाहीत म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता उत्तर कोरियालाच इशारा देत आम्ही हल्लाच करू असं म्हटलं आहे.
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात रंगलेल्या वादाच्या आगीत तेल ओतण्याचं काम चीननं केलं आहे अशीही माहिती समोर येतं आहे. अमेरिकेविरोधात चीननं उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग यांना भडकवलं आहे. उद्या युद्धाची वेळ आलीच तर चीन तुम्हाला पाठिंबा देईल असंही आश्वासन दिलं आहे त्याचमुळे उत्तर कोरिया अमेरिकेला इशारे देत होता. आता मात्र अमेरिकेनं उत्तर कोरियाला हल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेनं हल्ला केला तर चीन खरंच उत्तर कोरियाच्या मदतीला धावून येईल का? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.