अन्नपदार्थामध्ये आणि दुधामध्ये भेसळ करणे हा गंभीर गुन्हाच आहे आणि त्यादृष्टीने संबंधित कायद्यातील तरतुदी कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे केंद्राने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने अन्न संरक्षण आणि मानकेविषयक कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यानुसार या सुधारणा लवकरच केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिली.
भेसळयुक्त दुधामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत, अशी कबुलीही हर्षवर्धन यांनी दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तसेच व्यापक सार्वजनिक हिताचा विचार करता भेसळीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच अन्न संरक्षण आणि मानक कायदा २००६मध्ये बदल करण्याची गरज आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी नोंदवले होते. तसेच दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीस जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा करण्याची गरज असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते.

Story img Loader