आपल्या पृथ्वीपासून १७५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या बाल सौरमालेत खगोलशास्त्रज्ञांना बर्फाळ भाग सापडला आहे. वैश्विक हिमाचा हा प्रकार आहे. यातील हिमरेषा ही सूर्यासारख्या टीडब्ल्यू हायड्रा या ताऱ्याभोवती दिसली असून त्याचे बाल सौरमालेच्या दूरवरून घेतलेल्या छायाचित्रात ही रेषा दिसली आहे. यामुळे ग्रह व धूमकेतू यांच्या निर्मितीविषयी नवीन प्रकाश पडणार आहे. सौरमालेचा इतिहास ग्रहांचे घटक याचीही माहिती मिळणार आहे. खगोल वैज्ञानिकांनी अटाकामा लार्ज मिलीमीटर व सबमिलीमीटर अ‍ॅरे (अल्मा) या दुर्बिणीच्या मदतीने या बाल सौरमालेतील हिमरेषेचे छायाचित्र टिपले आहे. आपल्या पृथ्वीवर अतिशय उंचीवरच्या ठिकाणी जिथे हवेतील बाष्प हिमात रूपांतरित होते अशा ठिकाणी हिमरेषा दिसतात. पर्वतांवर या रेषा अधिक स्पष्ट दिसतात. जिथे हिमाच्छादित शिखरे संपतात व खडकाळ भाग सुरू होतो तिथे त्या विशेषत्वाने दिसतात. बाल सौरमालेतील हिमरेषा या तरुण ताऱ्यांभोवती अशाच पद्धतीने तयार झालेल्या असून त्या दूरवर असलेल्या धुळीच्या चकत्यांभोवती आहेत. ताऱ्यापासून सुरू होऊन त्या बाहेरच्या दिशेने जाताना दिसतात, यात पाणी गोठून त्या तयार होतात. ताऱ्यापासून दूर अंतराकडे जाताना कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड यांचे रेणू गोठतात. विविध प्रकारच्या हिमामुळे जाडसर धूलिकणांना एक प्रकारचे चिकट आवरण बाहेरून तयार होते. त्यामुळे त्यांची एकमेकांवर आदळण्याची प्रक्रिया थांबते व ते एकत्र बंदिस्त होऊन ग्रह व धूमकेतू यांचे पायाभूत घटक तयार होतात.
केंब्रिजच्या हार्वर्ड -सिम्थसॉनियन सेंटरचे चुनहुआ क्वी यांनी सांगितले, की अल्मा दुर्बिणीच्या मदतीने १७५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या टीडब्ल्यू हायड्रा या ताऱ्याभोवती कार्बन मोनॉक्साईडची हिमरेषा दिसली आहे. ही सौरमाला आपल्या सौरमालेसारखीच आहे, ती काही अब्ज वर्षे वयाची होती. या कार्बन मोनॉक्साईडच्या हिमरेषेचा परिणाम केवळ ग्रहांच्या निर्मितीपुरता मर्यादित नसून इतरही मोठे परिणाम असावेत. कार्बन मोनॉक्साईडचे बर्फ हे मेथॅनॉल निर्मितीसाठी आवश्यक असते व मेथॅनॉलचे रेणू हे सजीवसृष्टीच्या निर्मितीस आवश्यक असतात. सायन्स एक्स्प्रेस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
अल्मा दुर्बिणीच्या मदतीने १७५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या टीडब्ल्यू हायड्रा या ताऱ्याभोवती कार्बन मोनॉक्साईडची हिमरेषा दिसली आहे. ही सौरमाला आपल्या सौरमालेसारखीच आहे, . या कार्बन मोनॉक्साईडच्या हिमरेषेचा परिणाम केवळ ग्रहांच्या निर्मितीपुरता मर्यादित नसतो.