नासाच्या केप्लर दुर्बिणीच्या मदतीने खगोलवैज्ञानिकांनी असे सहा यजमान तारे शोधले आहेत, ज्यांच्या कक्षेत पृथ्वीच्या आकाराचे ग्रह फिरत आहेत. आपल्या आकाशगंगेत असे १७ अब्ज ग्रह फिरत आहेत. केप्लर दुर्बिणीच्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर १७ टक्के ताऱ्यांभोवती पृथ्वीच्या आकाराचे व बुधाइतक्या जवळच्या कक्षेतून फिरणारे ग्रह असल्याचे निष्पन्न झाले आहे. आकाशगंगेत अंदाजे शंभर अब्ज तारे असून त्यातील १७ टक्के ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत, त्याचाच दुसरा अर्थ तिथे जीवसृष्टीचे अस्तित्व असू शकते. निरीक्षणाच्या पहिल्या सोळा महिन्यांत असे २४०० ग्रह सापडले आहेत. ‘हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर फिजिक्स’ या संस्थेचे फ्रँकॉइस फ्रेसिन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केप्लर पाहणीतील माहितीचा वापर करून अशा ग्रहांचा अंदाज वर्तवला आहे. खगोलभौतिकीय अशा काही गुणधर्माची यादी उपलब्ध असते, ज्यात ग्रहीय संदेशांची नक्कल केलेली असते पण त्यात केप्लर पाहणीतील ग्रहांसारख्या एक दशांश ग्रहांचेच अस्तित्व कळू शकते.
केप्लर मोहिमेतील सध्याच्या निरीक्षणानुसार सूर्यासारख्या सर्वच ताऱ्यांभोवती असे ग्रह फिरत असण्याची शक्यता आहे. एकूण १७ टक्के ताऱ्यांच्या भोवती पृथ्वीच्या ०.८ ते १.२५ पट मोठय़ा आकाराचे ग्रह असून त्यांचा कक्षाकाळ हा ८५ दिवस किंवा त्यापेक्षा कमी आहे. एक चतुर्थाश ताऱ्यांभोवती महापृथ्वीसारखे ग्रह (म्हणजे पृथ्वीच्या १.२५ ते २ पट) फिरत असून त्यांचा कक्षाकाल हा १५० दिवसांचा आहे. साधारण तेवढय़ाच ताऱ्यांभोवती मिनी नेपच्यूनसारखे (पृथ्वीच्या २ ते ४ पट मोठे) ग्रह आहेत, त्यांचा कक्षाकाल २५० दिवस आहे.
साधारण तीन टक्के ताऱ्यांच्या भोवती पृथ्वीच्या ४ ते ६ पट मोठे मोठय़ा नेपच्यूनसारखे ग्रह दिसून येतात तर केवळ पाच टक्के ताऱ्यांभोवती पृथ्वीच्या ६ ते २२ पट मोठे ग्रह आहेत त्यांचा कक्षाकाल ४०० दिवस किंवा त्याहून कमी आहे. कॅलिफोर्निया येथील अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सभेत हे संशोधन सादर करण्यात आले. ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वैशिष्टय़े
* केप्लर दुर्बिणीतील माहितीच्या आधारे निष्कर्ष
* विविध आकारांचे ग्रह अस्तित्वात
* सोळा महिन्यांत २४०० ग्रहांचा शोध