अयोध्या प्रकरणी निकालानंतरच्या पहिल्या कार्तिक पौर्णिमेसाठी (देव दिवाळी) मंगळवारी शरयू नदीत पवित्र स्नानासाठी लाखो भाविक येथे दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निकालात वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्याचबरोबर केंद्र सरकारने सुन्नी वक्फ मंडळाला मशीद उभारणीसाठी ५ एकराचा भूखंड मध्यवर्ती ठिकाणी द्यावा असेही निकालात म्हटले होते.  राम की पायडी व नया घाट येथे भाविक पवित्र स्नान करणार असून पाच लाख भाविक कार्तिक पौर्णिमेसाठी आले आहेत. अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितले, की  इतर वेळी रामजन्मभूमी दर्शनासाठी आठ हजार भाविक तेथे भेट देतात. सणासुदीच्या काळात  पन्नास हजार लोक दर्शनासाठी येतात.  रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राम जन्मभूमी परिसरात परिस्थिती सुरळीत असून सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षित व अडचणींशिवाय दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, पोलीस अधिकारी व दंडाधिकारी यांना तेथे तैनात करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य, स्वच्छतागृहे, पेयजल या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. १८ ठिकाणी पाण्याचे टँकर पाठवले असून २० वैद्यकीय शिबिरे रुग्णवाहिका माध्यमातून सुरू केली आहेत. तीस फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. अयोध्येचे माहिती उपसंचालक मुरलीधर सिंह यांनी सांगितले, की सोमवारी सायंकाळी  चार वाजल्यापासूनच शरयू नदीत पवित्र स्नान करण्यास भाविकांनी सुरूवात केली असून मंगळवारी सायंकाळपर्यंत मुहूर्त आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार सोमवारी सायंकाळपासून कार्तिक पौर्णिमा सुरू झाली आहे.

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व सांगताना प्रयागराज येथील राम नाम बँक व राम सेवा ट्रस्टचे  निमंत्रक आशुतोष वाष्र्णेय यांनी  सांगितले, की कार्तिक पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो. त्यामुळे त्याला कार्तिक पौर्णिमा म्हणतात. ती देवदिवाळी म्हणूनही ओळखली जाते. याच दिवशी देव त्यांची दिवाळी साजरी करतात. सामान्य लोकांच्या दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी देवदिवाळी येते. कार्तिक पौर्णिमेला मंदिरात व गंगा किनारी पणत्या लावल्या जातात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millions of devotees file for ayodhya in kartik pournim abn
Show comments