सीमांचलमधून राज्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र विधानसभेत शिरकाव केल्यानंतर आता अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) बिहार विधानसभेत मुसंडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सीमांचल प्रदेशातून पक्ष निवडणूक लढविणार आहे.
पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरविले असून सीमांचल प्रदेशातील अरारिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या जिल्ह्य़ांतील विधानसभा मतदारसंघांतूनच उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहेत, असे पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी येथे सांगितले. आम्ही विजयाच्या संधीबद्दल वास्तववादी आहोत, आम्हाला आमची बलस्थाने आणि कच्चे दुवे माहिती आहेत, सीमांचल प्रदेशाच्या हितासाठी आणि न्यायासाठी आम्ही तेथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे ओवेसी म्हणाले. मात्र पक्ष किती जागा लढविणार आहे ते ओवेसी यांनी स्पष्ट केले नाही.
धर्मनिरपेक्ष आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चा?
बिहारमधील महाआघाडीतून सपा आणि राष्ट्रवादी बाहेर पडल्यानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाने बिहारमध्ये भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्यात रस दाखविला आहे. भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी जेएमएमही उत्सुक आहे आणि त्यासाठीच आघाडीत सहभागी होण्याबाबत आपण नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांच्याशी चर्चा केल्याचे झामुमोच्या हेमंत सोरेन यांनी सांगितले.

एनडीए जागावाटपाचा तिढा कायम
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएतील जागावाटपाची चर्चा तूर्त रखडली आहे. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी अधिक जागांच्या मागणीचा आग्रह धरल्याने भाजप आणि घटक पक्षांमधील जागावाटपाची चर्चा शनिवारी पूर्ण होऊ शकली नाही. मांझी यांनी अमित शहा यांची दोनदा भेट घेतली. हिंदुस्थान अवाम मोर्चा पक्षाला भाजपने अधिक जागा द्याव्या, अशी मागणी करून मांझी यांनी चर्चा रोखली.

‘एमआयएम संघाच्या हातचे खेळणे’
नागपूर : एमआयएम हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातातील खेळणे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद जलालुद्दीन यांनी येथे केला. मराठवाडय़ातील भाजपच्या एका बडय़ा नेत्यानेच एका जाहीर कार्यक्रमात एमआयएम भाजपसाठी फायद्याची असल्याचे वक्तव्य केले होते, असे सांगत त्यांनी एमआयएमवर टीका केली. मुस्लीम मतांचे विभाजन करून भाजपला मदत करण्याचे त्यांचे काम आहे, असेही जलालुद्दीन म्हणाले.

Story img Loader