मुलींचं लग्नासाठीचं वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यामुळे आता यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावरून सध्या देशात मोठी चर्चा सुरू असून आता एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. मोदींना नेमकी लग्नाबद्दल अडचण काय आहे? असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
१८ वर्षांनंतर लैंगिक संबंधांना परवानगी, पण..
महिलांचं लग्नाचं वय वाढवण्याला ओवैसी यांनी विरोध दर्शवला आहे. “आता केंद्रानं महिलांसाठी लग्नाचं वय १८ वरून २१ पर्यंत वाढवलं आहे. कायद्यानुसार तुम्ही एखाद्या महिलेसोबत १८व्या वर्षानंतर लैंगिक संबंध ठेवू शकता. पण तुम्ही तिच्याशी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नाबद्दल नेमकी काय अडचण आहे?” असं ओवैसी म्हणाले आहेत. मीरतमध्ये एका सभेमध्ये ते बोलत होते.
“आता भाजपा म्हणेल की…”
“आता भाजपा म्हणेल की ओवैसी आणि मुस्लिम महिलांच्या फायद्याच्या गोष्टीवर बोलत नाहीत. मोदीजी, तुम्ही आमचे काका कधीपासून झालात? कारण काका लोक फक्त जागेवर बसून प्रश्न विचारत राहतात. आता काका म्हणतायत लग्न करू नका”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
..म्हणून पंतप्रधान मोदी तेनींना हटवत नाहीत?
लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्यावरून देखील ओवैसींनी टीका केली आहे. “केंद्रीय गृहराज्यमंत्री तेनी यांनी कट रचला आणि त्याच्या परिणामस्वरूप त्यांच्या मुलानं ४ शेतकऱ्यांची हत्या केली. पण पंतप्रधानांना तेनी यांना पदावरून हटवायचं नाहीये. कारण त्यांना उत्तर प्रदेशमधल्या ब्राह्मण समाजाला दुखवायचं नाहीये”, असं ते म्हणाले.
“मी इथे तुम्हा सर्वांना आवाहन करतोय, की उत्तर प्रदेशच्या १९ टक्के मुस्लिमांना त्यांची स्वत:ची राजकीय शक्ती, नेतृत्व आणि सहभाग असायला हवा. आपल्याला मान मिळण्यासाठी, आपल्या तरुणांना शिक्षण मिळण्यासाठी, आपल्यावरील अत्याचार थांबण्यासाठी आणि भेदभाव संपण्यासाठी ते आवश्यक आहे. मुस्लीम जागे कधी होणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.