कर्नाटकच्या उडुपीमध्ये मुस्लीम मुलींनी बुरखा किंवा हिजाब घालून येण्यावर महाविद्यालयाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर त्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून या मुद्द्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुस्लीम मुलींनी महाविद्यालयात हिजाब घालून यावा की नाही? यावर दोन्ही बाजूंनी मतं मांडली जात असताना पाकिस्तानने या मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्यानंतर आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खड्या शब्दांत सुनावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकमध्ये हिजाब घालून येणाऱ्या मुलींना महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. “मुस्लीम महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे मानवाधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे. कुणालाही या अधिकारापासून वंचित ठेवणं आणि हिजाब घातला म्हणून त्यांना दहशतीत ठेवणं ही जबरदस्ती आहे. मुस्लिमांवर भारतातील एक राज्य दबाव टाकत आहे याची जगानं दखल घ्यावी”, असं ट्वीट कुरेशी यांनी केलं होतं. यानंतर ओवैसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले ओवैसी?

असदुद्दीन औवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील एका प्रचारसभेत बोलताना पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. “मलालावर हल्ला पाकिस्तानमध्येच झाला होता. पाकिस्तानच्या संविधानानुसार कुणी गैरमुस्लीम व्यक्ती तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे बघू नका. तिकडेच बघा”, असं ओवैसी म्हणाले आहेत.

“तुमच्याकडे बलुचींची समस्या आहे. तुमच्याकडे अनेक वाद आहेत. तुम्ही ते पाहा. हा देश माझा आहे. तुमचा नाही. हा आमच्या घरचा मुद्दा आहे. तुम्ही यात आपला पाय किंवा नाक नका खुपसू. तुमचा पाय आणि नाक जखमी होईल”, असा खोचक सल्ला देखील ओवैसी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim chief asadussin owaisi targets pakistan on hijab row in karnataka udupi pmw