गोव्यात खाण उद्योगाचे भविष्यात पुनर्जीवन होण्याची शक्यता असली तरी सध्या खोल गर्तेत सापडलेल्या खाण उद्योगामुळे त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. खाण उद्योग संकटात सापडला असून लवकरच तोडगा न निघाल्यास येत्या काळात गोव्यात आर्थिक मंदीची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गोव्यातील लोहखनिजाच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असून सरकारने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. गोव्यात खाण उद्योग सुरू झाल्यानंतर १९५० पासून प्रथमच बिचोलिम तालुक्यातील वेलगुएम, पाले गाव, फोंडय़ातील उसगाव, सागुएम, क्वेपेम तालुक्यांमधील अनेक गावांत राहणाऱ्या नागरिकांना या मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
खाण उद्योगात काम करणारे गजेंद्र उसगावकर यांचे दोन ट्रक असून आठ जणांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या ट्रकसाठी २० लाखांचे बँकेतून कर्ज घेतले आहे. त्यामुळे आता खाण उद्योग पुन्हा सुरू झाला नाही तर ट्रकपायी काढलेल्या कर्जामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येईल, असे उसगावकर यांनी सांगितले. गोव्यातील खाण उद्योग बेकायदेशीर ठरवून बंद झाल्यामुळे उसगावकरांसारखे असंख्य बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्रकमालकांना दिलेल्या कर्जाबाबत बँकांनी सबुरीचे आणि सहकार्याचे धोरण घ्यावे, असे आवाहन केले आहे. मात्र यामुळे ट्रकमालकांना कोणताही लाभ मिळणार नसून खाण उद्योग असाच बंद राहिला तर कर्जबाजारी झालेल्या ट्रकमालकांना उदरनिर्वाहासाठी इतर पर्याय धुंडाळावे लागतील, अशी भीती अखिल गोवा ट्रक मालक असोसिएशनचे अध्यक्ष निळकंठ गवस यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बंदीच्या घेऱ्यात अडकलेला गोव्यातील खाण उद्योग ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खनिजांची वाहतूक, साठवणुकीवरील बंदी कायम ठेवल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

Story img Loader