भाजपाचा कार्यकर्ता, पुण्याचे महापौर ते आता केंद्रीय मंत्री असा मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास आहे. गोपीनाथ मुंडे यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. माझं यश पाहण्यासाठी गोपीनाथ मुंडे असायला हवे होते असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. तसंच गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींत ते भावूक झाले, त्यांच्यामुळेच मी घडलो असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

“मला केंद्रीय मंत्रि‍पदाची जबाबदारी मिळेल अशी आशा नव्हती. मला जेव्हा कळलं की मलाही शपथ घ्यायची आहे ते समजल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. शपथविधीच्या आदल्यादिवशी मला राष्ट्रीय अध्यक्षांच्या पीएचा फोन आला आणि मला शपथविधीसाठी तयार राहायला सांगितलं. सुरुवातीला मला काही समजेना. शेतकऱ्याचा मुलगा होतो, घरच्या उसाच्या गाड्यावर काम केलं. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी फक्त भाजपातच मिळू शकते.” असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

हे पण वाचा- केंद्रीय मंत्री मोहोळांच्या समोरच भाजपाच्या दोन गटात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

नगरसेवक कसा झालो ?

“पुण्यातल्या कोथरुडमध्ये अनेकजण बाहेरून राहायला आले आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदमांचे बंधू हे सातत्याने चारवेळा त्या ठिकाणाहून नगरसेवक होते. त्यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि त्या ठिकाणी माझं नाव समोर आलं. माझ्या गावाकडून आणि परिसरातून लोक राहायला आले होते. पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी मला निवडून दिलं. त्यावेळी मला झालेला आनंद हा आतापेक्षाही मोठा होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींना भेटायला गेलो. त्यावेळी गोपीनाथ मुंडेनी माझं कौतुक केलं होतं. तिथून सुरू झालेला प्रवास आणि नंतर चार वेळा नगरसेवक झालो.” असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी ही आठवण सांगितली. तसं गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींत ते भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं.

गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं

“गोपीनाथ मुंडे लोकनेते होते, त्यांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांच्यासह एक पिढी घडली.” गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. “आज या सगळ्या आनंदात मला सर्वात जास्त आठवण कुणाची येत असेल, कुणाला मी मिस करत असेन तर ते गोपीनाथ मुंडेंना. मी त्यांच्या खूप जवळचा होतो. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळे राहून-राहून वाटतं की आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आजचा दिवस बघायला ते असायला हवे होते.” हे सांगताना मोहोळ भावूक झाले होते.

पराभव झाला तेव्हा गोपीनाथ मुंडेंसमोर जात नव्हतो पण

“कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख होती. २००९ मध्ये त्यांनी आदेश दिला आणि मी खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली. पण पराभव झाल्यानंतर भीतीमुळे मी गोपीनाथ मुंडेंच्यासमोर जात नव्हतो. असं दोन-तीनवेळा झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंना ते लक्षात आलं. पुण्यात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की त्यांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक ते हरले होते. त्यामुळे कसलाही विचार करू नकोस, कामाला लाग. त्यानंतर आजचा दिवस उजाडला. त्यामुळे आजच्या दिवशी मुंडे साहेबांची खूप आठवण येते.” असंही मोहोळ म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister murlidhar mohol emotional and talk about gopinath munde memories also said this thing scj