केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली. दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे.

नियमांचे पालन करावेच लागेल!

“रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालयं आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी जे नारायण यांनी दिली आहे.

‘ट्विटर’विरोधात आक्रमक भूमिका

अश्विनी वैष्णव यांच्याकडे रवीशंकर प्रसाद यांचं माहिती व तंत्रज्ञानमंत्री खात्याची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली आहे. रवीशंकर प्रसाद यांच्याप्रमाणे त्यांनाही ‘ट्विटर’ विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला इथल्या कायद्याचे व नियमांचे पालन करावे लागेल, असे नवनियुक्त माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केलं.

देशात कार्यरत असणाऱ्या समाजमाध्यम कंपन्यांसाठी माहिती-तंत्रज्ञान कायद्यतील नवे नियम २६ मेपासून लागू करण्यात आले असून ट्विटरवगळता अन्य कंपन्या या नियमांचे पालन करत आहेत. प्रत्येक समाजमाध्यम कंपनीला ग्राहक तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. मात्र, ‘ट्विटर’ने अजूनही या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही. या मुद्द्यावरून तत्कालिन केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ‘ट्विटर’ विरोधात आघाडी उघडली होती. ‘ट्विटर’ला देशातील नियमांचे पालन करावेच लागेल, असा इशारा प्रसाद यांनी दिला होता. नवे माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रसाद यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे.

प्रकरण काय?

उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये मुस्लीम व्यक्तीला मारहाण केल्यासंदर्भातील कथित दृकश्राव्य चित्रफितीवरूनही ‘ट्विटर’ला केंद्राने जाब विचारला होता. संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीनेही ‘ट्विटर’च्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. तत्कालिन केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही कठोर भूमिका घेतली होती.