देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी ( २९ ऑगस्ट ) पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलिंडरच्या ( एलपीजी ) किंमतीत २०० कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, भाजपाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत याहे. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एएनआय’शी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, “रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३३ कोटी बहिणींना अनोखी भेट दिली. त्याबद्दल पंतप्रधान मोदी धन्यवाद मानते. ९ कोटी ६० लाख बहिणींना ४०० रूपयांचं अनुदान मिळणार आहे.”

हेही वाचा : गॅस सिलेंडरही होतात एक्सपायर, सिलेंडरची ‘टेस्ट ड्यू डेट’ काय असते? ‘या’ पद्धतीने जाणून घेता येईल

“तसेच, विरोधी पक्षाने अशा प्रकारच्या बैठक करत राहाव्यात. हेच भारतासाठी लाभदायक आहे,” असा टोला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांवरून स्मृती इराणींनी विरोधकांना लगावला आहे.

“४०० चा गॅस ११०० रुपयांना विकून सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं”

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गॅसच्या दरात कपात केल्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. “जेव्हा मते कमी होऊ लागतात. तेव्हाच निवडणुकीच्या भेटवस्तू वाटल्या जातात. देशातील जनतेच्या कष्टाचा पैसा लुटणारे निर्दयी मोदी सरकार आता माता-भगिनींबद्दल सद्भावना दाखवत आहे. गेली साडेनऊ वर्ष ४०० रूपयांचं गॅस सिलिंड ११०० रूपयांना विकून सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तेव्हा, तुम्हाला आपुलकी आठवली नाही. १४० कोटी भारतीयांवर अत्याचार केल्यानंतर आता लॉलीपॉप देऊन चालणार नाही. याने तुमची एक दशकाची पापे धुतली जाणार नाहीत.”

“२०० रूपयांच्या अनुदानाने जनतेचा रोष कमी होणार नाही”

“भाजपाने आणणेल्या महागाईला तोंड देण्यासाठी काँग्रेस अनेक राज्यात ५०० रूपयांना सिलिंडर देणार आहे. राजस्थानसारख्या अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. २०० रूपयांच्या अनुदानाने देशातील जनतेचा रोष कमी करता येणार नाही, हे मोदी सरकारने जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही ‘इंडिया’ आघाडीला घाबरलात. जनतेनं आपला निर्णय घेतला आहे. महागाईवर मात करायची असेल, तर भाजपाला बाहेरचा दरवाजा दाखवणे, हाच पर्याय आहे,” असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

हेही वाचा : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसं ओळखायचं? टॉवेल वापरून तुम्ही क्षणात जाणून घेऊ शकता

काय आहे निर्णय?

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रूपयांची कपात करण्यात आली आहे. याचा थेट फायदा ३० कोटी ग्राहकांना होणार आहे. उज्ज्वला योजनेतून २०० रूपयांची सवलत ग्राहकांना मिळते. ती यापुढेही चालू राहणार आहे. याशिवाय नवीन जाहीर झालेला सवलत देखील मिळणार आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील ९ कोटी ६० लाख लाभार्थींना एकूण ४०० रूपयांची सवलत मिळणार आहे.

Story img Loader